Sanjay Raut : 'आयएनएस विक्रांत' निधीत घोटाळा; संजय राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप
Sanjay Raut On Kirit Somaiya : संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात नवा आरोप केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी सोमय्यांनी हडप केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
Sanjay Raut On Kirit Somaiya : शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आव्हानही राऊत यांनी केले. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्याने आरोप करत 'आएनएस विक्रांत फाइल्स' उघड केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले. आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते असा आरोप संजय राऊत यांनी केला. सोमय्या हे सीए असल्यामुळे या पैशांचे काय करायचे हे त्यांना ठाऊक असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी
किरीट सोमय्या यांनी विक्रांतच्या नावाखाली जमवलेला निधी हा आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवला आणि त्यांच्या निवडणुकीतही वापरला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या प्रकरणाची आयकर विभाग, ईडी, सीबीआयने चौकशी करावी अशीही मागणी राऊत यांनी केली. देशाच्या नागरिकांच्या भावनांशी खेळून, देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावर हा निधी जमवण्यात आला आणि त्याचा अपहार करण्यात आला. त्यामुळे सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असेही राऊत यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण?
‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सन १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. 'विक्रांत' वाचवण्यासाठी सोमय्या यांनी सामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरातील व्यक्तींकडून निधी जमवला होता.