कुर्ला रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा अवघ्या 12 तासांत शोध; आरोपी महिलेला अटक
Mumbai Crime News: कुर्ला रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा अवघ्या 12 तासांत शोध घेण्यात कुर्ला लोहमार्ग रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.
Mumbai Crime News: कुर्ला लोहमार्ग रेल्वे (Kurla Railway Station) पोलीस अधिकाऱ्यांनी 12 तासांच्या आत पाच वर्षांच्या मुलाचा शोध घेतला. त्यानंतर बाळाला सुखरुप आईच्या ताब्यात सोपवलं. दरम्यान, कुर्ला रेल्वे स्थानकातून बाळाच्या ओळखीच्या महिलेनं अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण केलं होतं. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत चिमुकल्याचा शोध घेत अपहरण करणाऱ्या महिलेला अटक केली.
जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेला मुलगा रेहानला त्याची आई शबनम मोहन ताडये (25) हिनं टिटवाळा येथून कुर्ल्याला आणलं होतं. शबनम केटरर्समध्ये काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम तिचं काम संपल्यानंतर इतर दोन महिलांसोबत सोमवारी पहाटे कुर्ला स्टेशनवर पोहोचली. पण तोपर्यंत टिटवाळ्याला जाणारी शेवटची ट्रेन आधीच निघून गेली होती. तिनही महिलांनी स्थानिक विक्रेत्याकडून चहाचा ग्लास घेतला आणि त्यानंतर रेहाना शेख नावाची एक महिला निघून गेली.त्यानंतर एक महिला, रेहान आणि रेहानची आई कुर्ला रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीजवळ झोपले. पहाटे 4 वाजता जेव्हा लोकल गाड्या थांबल्या आणि ताडयेला जाग आली, तेव्हा तिच्या कुशीत झोपलेला रेहान तिथे नव्हता. तिनं आजूबाजूला त्याला शोधलं पण तो तिला सापडला नाही. रेहानच काय, तर तिच्यासोबत असलेली महिलाही तिथे नव्हती. त्यानंतर ताडयेनं तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली."
पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करत पाच वर्षांच्या रेहानचा शोध सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना एक महिला रेहानसोबत फिरताना आणि ट्रेनमध्ये चढताना दिसली. पोलिसांनी रेहानच्या आईला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. त्यावेळी तिनं सांगितलं की, आरोपी महिला तिच्यासोबत काम करत होती आणि निघण्यापूर्वी चहासाठी थांबली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीचा पुढील मार्ग काढल्यानंतर पोलीस अधिकारी आरे मिल्क कॉलनीत पोहोचले, जिथे त्यांना रेहानसोबत रेहाना सापडली. पोलिसांनी चिमुकल्या रेहानला ताब्यात घेतलं आणि 24 वर्षीय रेहानाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहाना तिथून निघून गेल्यावर तिकीट काउंटर परिसरात परतली आणि रेहान आणि त्याची आई झोपलेले असताना तिनं तिथून रेहानला उठवलं आणि त्याला स्वतःसोबत यायला सांगितलं.
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, रेहाना एकटीच होती. काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. तिचं कुटुंबही नव्हतं. त्यामुळे तिनं हे पाऊल उचललं असावं. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. रेहानचं अपहरण करण्यामागे नेमका काय हेतू होता? यामागे एखादी मुलं पळवणारी टोळी तर सक्रिय नाही, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.