Kedar Jadhav : भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, क्रिकेटर केदार जाधव अतुल सावेंसोबत विधानभवनात दाखल, राजकीय इनिंग सुरु करणार?
Kedar Jadhav : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव विधानभवनात दाखल झाला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंसोबत केदार जाधव विधिमंडळात दाखल झाला आहे
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) अनेकदा भाजप नेत्यांसोबत दिसून आला आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) विजेतेपद मिळवल्याच्या निमित्तानं विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव विधानभवनात दाखल झाला आहे. केदार जाधव भाजप मंत्री अतुल सावे यांच्यासोबत विधानभवनात दाखल झाला आहे. यापूर्वी देखील अनेकदा केदार जाधव आणि भाजप नेत्यांची गाठभेट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आज नेमक्या कोणत्या कारणानं केदार जाधव विधानभवनात दाखल झाला हे स्पष्ट झालेलं नाही.
केदार जाधव भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा
केदार जाधवनं काही दिवसांपूर्वी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आज तो भाजप नेते मंत्री अतुल सावे यांच्यासोबत आज विधानमंडळात आला आहे. यापूर्वी देखील केदार जाधव भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून आला होता. यामुळं केदार जाधव भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहेत. केदार जाधवनं काही दिवसांपूर्वी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळं केदार जाधव क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात नवी इनिंग सुरु करणार का हे पाहावं लागेल.
विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार
विधानपरिषदेत काल टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी आशिष शेलार यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन विरोधकांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेत आज सभागृहात भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल. भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला याबाबत आज अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
केदार जाधवचं करिअर
केदार जाधव यानं भारतासाठी 73 वनडे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केले आहे. केदार जाधव यानं 52 डावात 1389 धावा केल्या आहेत. केदार जाधव यानं वनडेमध्ये दोन शतकं आणि सहा अर्धशतके ठोकली आहे. केदार जाधव यानं 2015 ते 17 या दरम्यान 9 आंतराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. यामधील सहा डावात 122 धावा चोपल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 58 इतकी आहे. तर आयपीएलमध्ये केदार जाधव यानं 95 सामने खेळले आहेत. त्यामधील 81 डावात त्याने 1208 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 इतकी राहिली आहे. केदार जाधव याने आयपीएलमध्ये चार अर्धशतके ठोकली आहेत.
इतर बातम्या :