एक्स्प्लोर
Advertisement
कडोंमपामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हाती 'अर्थ'पूर्ण खात्यांचा कारभार
सुनील जोशी.. कल्याण डोंबिवली महापालिकेतलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. सध्या गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता असलेल्या जोशी यांना आतापर्यंत दोन वेळा लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे, तर तब्बल तीन वेळा त्यांचं निलंबन करण्यात आलं.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत माकडाच्या हाती कोलीत दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण दोन वेळा लाच प्रकरणात अटक झालेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याकडे चक्क अनधिकृत बांधकाम आणि फेरीवालाविरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे.
सुनील जोशी.. कल्याण डोंबिवली महापालिकेतलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. सध्या गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता असलेल्या जोशी यांना आतापर्यंत दोन वेळा लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे, तर तब्बल तीन वेळा त्यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र सध्या जोशी हे एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे जोशींना देण्यात आलेली वाढीव जबाबदारी. आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जोशी यांना केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी आता अनधिकृत बांधकामविरोधी पथक आणि फेरीवालाविरोधी पथकाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या ग्रामीण पट्ट्यात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून आता जोशी या बांधकामांवर कारवाई करणार? की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची मालिका सुरु होणार? असा प्रश्न कल्याण-डोंबिवलीकरांना पडला आहे.
जोशी यांना देण्यात आलेल्या कारभारबाबत आयुक्त गोविंद बोडके यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सोबतच केडीएमसीमध्ये अधिकारी वर्ग कमी असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांमध्येच खाती वाटण्याशिवाय पर्याय नसल्याचं गोविंद बोडके यांचं म्हणणं आहे. मात्र यावर कल्याण-डोंबिवलीतल्या जागरुक नागरिकांनी सडकून टीका केली आहे.
जोशी यांना अतिरिक्त कार्यभार देताना महापालिकेने उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या बदलत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. मात्र जोशी हे उपायुक्त नसून कार्यकारी अभियंता आहेत. शिवाय अशाप्रकारे अतिरिक्त जबाबदारी द्यायची झालीच, तरी ज्यांची भ्रष्टाचाराच्या किंवा अन्य प्रकरणात विभागीय चौकशी सुरु आहे, त्यांना जबाबदारी देऊ नये, असे शासनानेच स्पष्ट आदेश आहेत. मात्र तरीही जोशी यांच्यावर प्रशासन इतकं मेहेरबान का आहे? हा संशोधनाचा विषय आहे.
अनधिकृत बांधकाम आणि फेरीवालाविरोधी पथक या दोन्ही विभागांचा कार्यभार जोशी यांच्यापूर्वी उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे होता. विशेष म्हणजे, सुरेश पवार यांनाही एकदा लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे खांदेपालट झाला असला, तरी राव गेले अन् पंत आले, इतकाच काय तो फरक...
कल्याण-डोंबिवलीला फेरीवाल्यांनी घातलेला विळखा, अनधिकृत बांधकामांचा झालेला सुळसुळाट आणि त्यात भर म्हणून जोशींची पार्श्वभूमी.. अशा परिस्थितीत आता जोशी कितपत प्रभावी ठरतात, हे येणारा काळच सांगेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement