लॉकडाऊन समस्या नव्हे संधी... कल्याणमधील उच्चशिक्षित तरुणांची व्यवसाय भरारी
लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नोकरी, रोजगार गमावले. पण कल्याणमधल्या नोकरी गमावलेल्या दोन तरुणांनी लॉकडाऊनकडे समस्या नाही तर संधी म्हणून पाहिलं आणि व्यवसाय सुरु केला. आता त्यांनी आणखी 50 जणांना रोजगार दिला आहे
कल्याण : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार आणि नोकऱ्या हिरावल्या गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. या काळात हाताला काम मिळावे या उद्देशाने अनेकांनी छोट्या मोठ्या व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते यशस्वी देखील झाले. आज या व्यवसायातून गगनभरारी घेतलेल्या अनेक व्यावसायिकांना आता मागे वळून पाहण्याची देखील गरज उरलेली नाही. कल्याणमधील दोन उच्चशिक्षित तरुणांनी असाच आदर्श घालून दिला आहे. 'हुकुम किजीए' या पार्सल सेवेच्या माध्यमातून या तरुणांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 10 हजार ग्राहक आणि 25 हजार सबस्क्रायबरचे नेटवर्क तयार केले. या दोन तरुणांनी स्वतः रोजगार मिळवलाच पण त्याचबरोबर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आणखी 50 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत.
लॉकडाऊन काळात सर्व काही बंद असताना केवळ खानपान सेवा सुरु होती. हॉटेल बंद असली तरी हॉटेलची पार्सल सेवा सुरु असल्याने अनेक पार्सल सेवा या काळात झपाट्याने उदयास आल्या आणि फोफावल्यासुद्धा. कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात राहणारा अली मजिद आणि उमर डोलारे हे दोन उच्चशिक्षित तरुण कोरोनापूर्वी नामांकित कंपनीमध्ये काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी सुटली. सुरुवातीला काही दिवस ते निराशेत होते. मात्र या काळात त्यांनी नोकरीच्या मागे न धावता काहीतरी व्यवसाय करण्याचा निश्चय केला होता. मात्र कोणता हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्या काळात हॉटेल्स बंद होती मात्र पार्सल सेवा सुरु होती. अली याने एकदा एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून एका हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर केली. जेव्हा त्याच्या हातात जेवण पडले त्याचवेळी त्याच पार्सलबरोबर त्यांच्या डोक्यात देखील व्यवसायाची कल्पना तयार झाली. त्याने फूड डिलिव्हरी व्यवसायातच उतरण्याचा निश्चय त्याच क्षणी केला.
अली मजिदने आपला मित्र उमरला ही कल्पना सांगताच त्यालाही ती आवडली. ध्येयाने झपाटलेल्या या दोघांनी दोन महिने दिवसरात्र या व्यवसायातले बारकावे शोधत अभ्यास करत व्यवसायाबाबत पूर्ण माहिती जमा केली आणि हाती असलेल्या भांडवलाच्या जोरावर या व्यवसायाची सुरुवात त्यांनी भिवंडी इथून केली. 'हुकुम कीजिए' या नावाने त्यांनी सुरु केलेली पार्सल सेवा कल्याण डोंबिवली आणि भिवंडी शहरातील नामांकित हॉटेलपासून ते वडपावच्या दुकानापर्यंत लोकाना गरमागरम अन्नपदार्थ घरपोच पोहोचवण्याचे काम करते. मागील वर्षभरापासून 'हुकुम कीजिए'चा विस्तार भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. या तरुणांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर वर्षभरात तब्बल 10 हजार ग्राहक जोडताना 25 हजार हून अधिक नागरिकांपर्यत अॅपच्या माध्यमातून पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 'हुकुम कीजिए' पार्सल सेवेत आज 50 तरुणांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्याच्या नेटवर्कमध्ये 'हुकुम कीजिए'ने देखील आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत वेगाने पंख पसरवण्यास सुरुवात केली आहे.