Jogeshwari Fire News : मुंबईच्या ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला लागलेली आग आटोक्यात, 20 ते 25 दुकानं जळून खाक
Jogeshwari Fire News : जोगेश्वरी परिसरात सकाळच्या दरम्यान फर्निचर गोदामाला भीषण आग लागली.
Jogeshwari Fire News : मुंबईच्या (Mumbai) पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम जवळील ओशिवरा (Oshiwara) घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरु आहे. आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल 20 ते 25 फर्निचरची दुकानं जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ओशिवरा (Oshiwara) घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला आज (13 मार्च) सकाळी अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली. लाकूड गोदाम आणि फर्निचरचे शॉप असल्यामुळे काही वेळातच आगीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाकडून लेव्हल 3 च्या आगीचा कॉल देण्यात आला होता. सुदैवाने ही आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं.
ओशिवरा परिसरात भीषण आग
जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या आगीत सकाळच्या दरम्यान लाकूड गोदामाला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
Major fire in Oshiwara . We can hear the scream up here. #heartbreaking #help @mumbaifireserve @MumbaiPolice pic.twitter.com/995oZo077w
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) March 13, 2023
दरम्यान, या आगीचा व्हिडीओ मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तरी, या व्हिडीओमध्ये आगीचं प्रमाण किती भीषण आहे हे दिसून येतं.
प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना
मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्या दुकानातील माल वाचवण्यासाठी ते बाहेर काढताना धडपड असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :