मुंबई आयआयटीकडून इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञान विकसित पॅकेज
आयआयटी-बॉम्बे, कस्तुरबा हॉस्पिटल, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया यांच्या एकत्रित सहयोगाने हे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे.
मुंबई : आयआयटी-बॉम्बेच्या प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने गंभीर कोरोना लक्षणे आढळणाऱ्या आणि कोरोनाचा अधिक धोका संभावणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करण्यासाठी इन्फ्रा-रेड तंत्रज्ञानाचा वापर करण्याची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. यामुळे गंभीर स्वरूपाचा कोरोना आधीच इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे आधीच कळू शकणार आहे. रुग्णाला कोरोनाचा धोका आणि वाढणारी लक्षण आधीच लक्षात आणून देणारी हे तंत्रज्ञान आहे तरी काय?
मुंबई आयआयटीच्या बायोसायन्स आणि बायो इंजिनीअरिंग विभागाने इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्लाझ्मामधून केमिकल तपासणी करून कोरोना रुग्णाचे हाय रिस्क, लो रिस्क वर्गीकरण करणे आधीच शक्य होणार आहे. ज्यामुळे हाय रिस्क रुग्णांसाठी विशेष काळजी घेता येणार आहे.
डॉक्टरांना कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा कोविड रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते. आयआयटी-बॉम्बे, कस्तुरबा हॉस्पिटल, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया यांच्या एकत्रित सहयोगाने हे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. कस्तुरबा येथील 160 कोविड रुग्णांच्या गटात गंभीर प्रकरणांचे वर्गीकरण करण्यासाठी संशोधकांनी फूरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड (एफटी-आयआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा रक्त चाचणी म्हणून वापर केला.
इन्फ्रा-रेड स्पेक्ट्रोस्कोपी सामान्यतः कोणत्याही रक्ताच्या नमुन्यातील विविध रासायनिक गटांची पातळी मोजण्यासाठी वापरली जाते. कोविड रूग्णांच्या अभ्यासात 85 टक्के अचूकतेसह केलेली चाचणी ही उपचारादरम्यान उपयुक्त ठरू शकते. या चाचणीनंतर रूग्णांचे प्राथमिक मूल्यांकन, सामान्यतः कोरोना रुग्णाची काळजी घेण्याची निकड ठरवण्यासाठी जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या भागात या चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. शिवाय या चाचणीचा निकाल सुद्धा अवघ्या काही तासात मिळणार असून सर्व सामान्यांना परवडेल इतक्या खर्चात ही चाचणी करता येणार आहे.
त्यामुळे आयआयटी मुंबईने विकसित केलेले हे इन्फ्रा रेड तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने कोरोनाची गंभीर लक्षणे आणि धोका जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे तर आहेच शिवाय या तंत्रज्ञानद्वारे गंभीर स्वरूपाच्या कोरोना रुग्णांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून वाचवण्यासाठी व योग्य ते उपचार खबरदारी घेण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा डॉक्टरांना होणार आहे.