Oxygen Express : पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी आज रवाना, गाडीसाठी स्पेशल ग्रीन कॉरिडॉर!
महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस आज मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला.
मुंबई : महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस आज मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला. आज रवाना झालेली एक्सप्रेस ही सात टँकरसह विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. अंदाजे 24 तासात ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचेल आणि त्यानंतर तिथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. या एक्सप्रेससाठी राज्य सरकारकडून रेल्वेला टँकर्स पुरविण्यात आलेले असून रेल्वे हे रिकामे टॅंकर घेऊन देशातील विविध शहरांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवणार आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असल्याने ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भेडसावत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा वापर करून त्यांची वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली होती. त्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने पुढे येत रो रो सर्विसचा वापर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मध्य रेल्वेचे कळंबोली आणि पश्चिम रेल्वेचे बोईसर स्थानक निश्चित करून त्या ठिकाणी रॅम्प बांधण्यात आले आहेत. अशीच सुविधा इतर काही ठिकाणी देखील उभारण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
गाडीसाठी विशाखापट्टणमपर्यंत ग्रीन कॉरिडॉर
आज सुटलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून 10 टँकर्स पाठवण्यात येणार होते. मात्र 4 टँकर्सची उंची जास्त असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. शेवटी 7 टँकर्स घेऊन ही गाडी निघाली. या गाडीसाठी विशाखापट्टणमपर्यंत ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीची वाहतूक लवकर होईल. तर ज्यावेळी ही गाडी ऑक्सिजन घेऊन पुन्हा येईल त्यावेळी जास्त गरज असलेल्या ठिकाणी प्रथम, अश्या प्रकारे य ऑक्सिजनचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी रस्त्यावर देखील ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. ही पहिलीच गाडी असल्याने त्यात ज्या गोष्टी कमी राहतील त्या पुढच्या वेळी भरून काढू असेही ते म्हणाले. तसेच य एक्सप्रेस चालवण्यासाठी खर्च कोणी करायचा याबाबत अजूनही काही चर्चा झाली नसून, माणसांचे जीव महत्त्वाचे आहे, त्यासाठी वेळ आली तर पैसे देखील खर्च करू असे अनिल परब म्हणाले.
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळे पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असे केंद्र शासनाला सुचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली असून यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्याचा परिवहन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या आठ दिवसांपासून केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत होते. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे आकारमान, उंची याअनुषंगाने विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावरुन वाहतूक करण्याबाबत काही अडचणी, आव्हाने होती. तथापि, योग्य आकारमानाचे टँकरचा शोध घेऊन कळंबोली येथील प्लॅटफॉर्म काही अंशी अपूर्ण असल्याने बोईसर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेच्या सपाट वॅगनवर रिकामे टँकर लोड करुन यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.
कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसात येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले; आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी 16 मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.