प्रियकरासोबत फोटो पाहून संतापलेल्या पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न, पत्नी गंभीर जखमी
काजल शिगवणच्या गळ्याला, मानेला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. तिला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे.
कल्याण : पतीने पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या जोशीबाग परिसरात घडली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजल्यानं संतापाच्या भरात पतीने हे कृत्य केलं आहे.
विकास शिगवण आणि काजल शिगवण असं या दाम्पत्याचं नाव असून ते मोहने इथे राहतात. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्यानं काजल ही कल्याणच्या जोशीबागेत असलेल्या माहेरी राहायला आली होती. त्यातच काजल हिचे विवाहबाह्य संबंध असल्याची बाब विकासला समजली.
एवढच नव्हे, तर विकासने काजल आणि तिच्या प्रियकराचा फोटोही पाहिला आणि त्याचा राग अनावर झाला. त्यामुळे बुधवारी काजल आणि साडेतीन वर्षांची मुलगी घरात असताना अचानक विकास मागच्या दाराने घरात घुसला आणि काजलवर चाकूने हल्ला चढवला.
"तू माझी होऊ शकत नसशील तर कुणाचीच होऊ शकत नाही", असं म्हणत विकासने काजलवर तब्बल आठ वार केले. ज्यात तिच्या गळ्याला, मानेला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.
या घटनेनंतर शेजाऱ्यांनी विकासला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर काजलची प्रकृती गंभीर असल्यानं तिला मुंबईला हलवण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे. तर विकास याला पोलिसांनी अटक केली आहे.