(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंदिरा गांधींच्या कर्तृत्त्वाबद्दल प्रचंड आदर, माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड
इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील सभेत केलं. या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख उत्तरं दिलं जाईल असं म्हटलं आहे. यानंतर इंदिरा गांधी यांचा आदर असल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
मुंबई : बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले जात आहेत. पण इंदिरा गांधींना मानणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्त्वाबद्दल मला प्रचंड आदर आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. आणीबाणीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं जितेंद्र आव्हाड बीडमधील संविधान महासभेत केलं. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहेत. मी स्पष्ट सांगतो, इंदिरा गांधींना अतिशय आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर काँग्रेस ही लोकचळवळ आहे जी महात्मा गांधींजींची होती. संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई झालीच पाहिजे हा निर्णय जेव्हा आला, तेव्हा यामागील प्रमुख भूमिका इंदिरा गांधींची होती. पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण, राजा-महाराजांचे तनखे बंद करणं, 71 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणं, सिक्कीम खेचून घेऊन समाविष्ट करणं, चीनला धक्का देणं, पोखरणला अणुचाचणी घेणं. पण 75 ते 77 च्या काळामध्ये त्यांच्या काही भूमिकांमुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतेय असं इथल्या जनतेला वाटू लागलं. काही जण त्यांच्या बाजूने होते, काही विरोधात होते. या सगळ्याविरुद्ध 74 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आणि कालांतराने त्याचं नेतृत्त्व जयप्रकाश नारायण यांनी केलं, 77 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला. हा इतिहास आहे. देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जाते, असं जनतेला वाटतं, तेव्हा जनता पेटून उठते. आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडतंय. माझं म्हणणंच ते आहे आणि मी ठामपणाने बोलतो, जर या देशात इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो, ज्यांच्याएवढं कर्तृत्त्व कोणाचंच नव्हतं, तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत? माझे मित्र किरीट सोमय्यांनीही लक्षात ठेवावं, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे आणि मला लाज नाही वाटत सांगायला. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाहांशी होऊच शकत नाही."
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला, बीडमधल्या सभेत जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य
बीडमधील सभेत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? "इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते. मात्र अहमदाबादच्या आणि पाटण्याच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झालं आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल, म्हणून याचे श्रेय जेएनयू आणि तिथल्या विद्यार्थ्यांला जातं," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. "विद्यार्थी न घाबरता बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगत आवाज देत आहेत. आज विद्यार्थी संख्येने कमी दिसत आहेत. मात्र ही संख्या हळूहळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील," असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची नाराजी जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं पण कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. @Awhadspeaks यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2020
आव्हाड खरं बोलले : किरीट सोमय्या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भापनेही चिमटा काढला आहे. जितेंद्र आव्हाव खरं बोलले, असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील सभेत सांगितलं की इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता. खरं बोललेत ते आणि मला विश्वास आहे, शरद पवार, शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्या या मंत्र्याच्या वक्तव्याशी सहमती व्यक्त करणार."