कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाडीचा आरोप, हॉटेलच्या मेडिकल कोऑर्डिनेटर अटकेत
मुंबईच्या अंधेरीतील हॉटेलमध्ये क्वॉरन्टीन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : हॉटेलमध्ये क्वॉरन्टीन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात ही धक्कादायक मंगळवारी (13 एप्रिल) घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सरफराज मोहम्मद अकबर खान असं आरोपीचं नाव असून तो 37 वर्षांचा आहे. सरफराज व्यवसायाने मेडिकल कोऑर्डिनेटर असून तो कल्याणमधील रहीम पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहतो.
संबंधित महिला नवी मुंबईच्या कामोठे परिसरात पती, मुलगा आणि सासूसोबत राहते. तिचा पती बँकेत काम करतो. मागील आठवड्यातच त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. 7 एप्रिलपासून सगळ्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
अहवाल आल्यानंतर बँकेकडून सगळ्यांनाच अंधेरीच्या विट्स हॉटेलमध्ये क्वॉरन्टीन करण्यात आलं होतं. याच दरम्यान महिलेचा पती आणि सासूलाही त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल केलं. मात्र ही महिला आणि तिचा मुलगा त्याच हॉटेलमध्ये क्वॉरन्टीन होते.
12 एप्रिलला महिलेने डिस्चार्ज मिळण्यासाठी हॉटेलच्या लोकांना विनंती केली आणि घरातही क्वॉरन्टीन राहू शकते, असं सांगितलं. त्यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित एका महिलेने तिला सरफराजचा नंबर देऊन तोच समन्वयाचं काम करतो असं सांगितलं. जेव्हा महिलेने त्याला फोन केला तेव्हा हॉटेलमध्ये येऊन बोलू असं सांगून तो काही वेळातच तिथे पोहोचला. आम्ही तुम्हाला असा डिस्चार्ज देऊ शकत नाही, यासाठी आपल्याला डीएमशी बोलावं लागेल, असं सांगून तो निघून गेला.
काही वेळाने सरफराज तिथे आला. यावेळी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तू रुमबाहेर जावं असं तिने सरफराजला सांगितलं. जर मी तुला डिस्चार्ज मिळवून दिला तर काय करु शकतेस असं म्हणत तो तिची छेड काढू लागला. तसंच महिलेकडे शरीर सुखाची मागणीही केली. महिलेने याचा विरोध केला आणि कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली.
मी याची तक्रार पती, कुटुंबीय आणि हॉटेलच्या लोकांना करणार असल्याचं महिलेने म्हटलं. यानंतर सरफराज घाबरला आणि तिला डिस्चार्ज देण्यास तयार झाला. सोबतच तक्रार न करण्याची विनंती केली. मग महिलेने या घटनेची माहिती पती आणि पोलीस कंट्रोल रुमला दिली. फोन आल्यानंतर तातडीने एमआयडीएस पोलीसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर आयपीसीच्या कलम 354 (अ) आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक केले आहे. न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे.