हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे डोंबिवलीतील दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकर आहे.
कल्याण : हिमाचल प्रदेश येथील किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात ट्रेकिंगसाठी गेलेले तिन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं . मृत्यू झालेल्या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकर आहेत राजेंद्र पाठक (67 वर्षे) आणि अशोक भालेराव (66 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव दोघेही डोंबिवलीचे होते. दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड होती. वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील ही आवड त्यांनी जोपासली होती. जवळपास 40 वर्ष दोघे एकत्रित ट्रेकिंग करत होते. मात्र हा ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला. मागील तीन दिवसापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध लागला का? याकडे डोळे लावून बसले होते.
डोंबिवली पूर्वेकडील सुरेखा को ऑप सोसायटीत राहणारे राजेंद्र पाठक आपले भाऊ दीपक, पत्नी वैजयंती आणि मुलासोबत राहत होते. तर अशोक भालेराव ठाकुर्लीमधील स्नेहगंध सोसायटीत राहत होते. दोघेही शाळेपासूनचे मित्र होते. शाळेपासून मित्र असल्याने दोघांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध होते. राजेंद्र पाठक यांना ट्रेकिंग बरोबरच संगीताची आवड होती. शाळेपासून जिवलग मित्र असलेल्या राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव या दोघाना ही ट्रेकिंगची खूप आवड होती. दोघांनी जवळपास 40 वर्षे एव्हरेस्ट, सह्याद्री, हिमालयासह एवरेस्टची ट्रेकिंग केली होती. त्यामुळे दोघांकडे गिर्यारोहणाचा दांडगा अनुभव होता. वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील दोघांनी ट्रेकिंगची आवड जोपासली होती.
कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच त्यांना पुन्हा ट्रेकिंगची ओढ लागली. त्यांनी मालाडच्या ग्रुपबरोबर हिमाचल प्रदेशचा ट्रेकला जाण्याचे ठरवले. 16 ऑक्टोबर रोजी विमानाने ते हिमाचल प्रदेशला गेल्यानंतर त्यांनी इतर 17 जणाच्या ग्रुपबरोबर ट्रेकिंगला सुरुवात केली. 10 दिवसाचा ट्रेक संपवून आज 26 ऑक्टोबरला परत येणार होते . मात्र त्या आधीच 23 ऑक्टोबरला किन्नोर भागात झालेल्या प्रचंड हिम वर्षावात काळाने या दोन्ही जिवलग मित्रांवर घाला घातला. हा ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला.
आयुष्यभर सोबत असलेल्या या मित्रांना मृत्यू देखील वेगळा करू शकला नाही. ग्रुपमध्ये सर्वात लीडवर असलेल्या तिघेजण बर्फात गाडले गेले तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. रविवारी त्यांच्या ग्रुपमधील मित्रांनी घरी फोन करून त्यांच्या निधनाची वार्ता दिल्यापासून त्याचे नातेवाईक येणाऱ्या प्रत्येक वृत्ताकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र तीन दिवसानंतरही त्यांचे मृतदेह हाती लागत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले असून संबधित यंत्रणा आपल्या पातळीवर काम करत आहेत. मात्र सरकारने संबधित यंत्रणेला आवश्यक ती मदत करावी जेणेकरून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहचू शकतील अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यांच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :