हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तीन गिर्यारोहकांचा मृत्यू, 10 जणांना वाचवण्यात यश
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. 10 जणांना वाचवण्यात यश आलं असून 13 पैकी 12 जण महाराष्ट्रातले
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षावात महाराष्ट्रातील 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालच्या एका गिर्यारोहकासह 13 जण रोहरू-बरुआ कांडा मार्गानं किन्नौरच्या सांगलाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी मोठी बर्फवृष्टी झाल्यानं बरुआ कांडा भागांत हे गिर्यारोहक अडकून बसले. या तेरापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. दीपक राव, राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव अशी मृतांची नावं आहेत. आयटीबीपीची 17 व्या बटालियनकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात (Kinnaur District) 3 पर्यटकांचा मृत्यू झाला. असं सांगितलं जात आहे की, 13 पर्यटक शिमला जिल्ह्यातील रोहरुमधून किन्नौर जिल्ह्यातील सांगलाकडे ट्रेकिंगसाठी जात होते. यापैकी तीन पर्यटकांचा सांगला येथे येत असताना मृत्यू झाला. तसेच, सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाद्वारे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांची क्यूआरटी टीम आणि आयटीबीपीचे जवान यांच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तीन मृतदेह आणण्यासाठी आयटीबीपी जवानांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे 10 पर्यटकांना सुरक्षित काढण्यासाठी पोलीस दलही घटनास्थळी दाखल झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पर्यंटकांपैकी 12 मुंबई आणि इतर पर्यंटक गोवा आणि दिल्लीतील राहणारे आहेत. दरम्यान, मदत आणि बचाव कार्यात बर्फवृष्टी आणि हवामान बदलांमुळे अनेक अडथळे येत आहेत.
किन्नौरला येणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा
किन्नौरचे उपायुक्त अपूर्व देवगण यांनी किन्नौरला येणाऱ्या पर्यटकांना प्रतिकूल परिस्थितीतून बचाव करण्यासाठी खराब वातावरणात उंच ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, पावसाळ्यात काही भागांत, काही ठिकाणी भूस्खलन होतं. याचा धोका स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही आहे. त्यामुळे अशा वेळी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं. यापूर्वी 11 ट्रेकर्स बर्फवृष्टीत अटकले होते. ते चितकुलला जात असताना बेपत्ता झाले होते.