Nirav Modi: नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याला विरोध; पीएनबी बँकेला दिलेल्या परवानगीविरोधात ईडी हायकोर्टात
Nirav Modi PNB Scam: पीएनबी बँकेला मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या परवानगीला ईडीने हायकोर्टात आव्हान दिले् आहे. जनतेचा बुडालेला पैसा वसूल करण्यासाठी बँकेनं काय केलं? असा हायकोर्टाने सुनावणीच्या वेळी सवाल केला.
Nirav Modi: पीएनबी आर्थिक घोटाळा (PNB Scam) प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) याची संपत्ती जप्त करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेला सत्र न्यायालयाने परवानगी दिली. त्याविरोधात आता ईडीने (ED) हायकोर्टाने धाव घेत जप्तीच्या कारवाईला विरोध केला आहे. फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या मालमत्ता जप्त करण्यावरून पंजाब अँड नॅशनल बँकेला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं चांगलच धारेवर धरलं. याप्रकरणात मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसे गुंतलेला असताना बँकेनं ही रक्कम वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. हा सार्वजनिक निधी उपलब्ध असूनही सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घ्यावी लागतात, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं मंगळवारी केली.
नीरव मोदीविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात 424 कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने बँकेला दिली होती. या आदेशाला ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून याचिकेची दखल घेत नीरव मोदीसह अन्य प्रतिवाद्यांना हायकोर्टानं नोटीस बजावतो उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नीरव मोदीच्या 48 मालमत्तांपैकी 47 मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं दिला आहे. तर संलग्न मालमत्तांपैकी 40 मालमत्तांपैकी 7 मालमत्ता जप्त करण्यास बँकेला ईडीनं परवानगी दिल्याचंही बँकेच्यावतीनं हायकोर्टाला सांगण्यात आलं. तसेच या गैरव्यवहाराबाबत बँकेला कोणतीही माहीती नव्हती, ही सगळी कर्ज ही बेकायदा असल्याचा दावाही बँकेच्यावतीनं हायकोर्टात केला गेला. त्याची दखल घेत हायकोर्टानं बँकेच्या दाव्यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश ईडीला दिले.
ईडीकडून मोदीच्या संपत्तीवर टाच
पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीला पीएमएलए कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये फरार घोषित केले होते. ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे. मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली. त्याशिवाय, ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.