Navneet Rana And Ravi Rana : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज निर्णय नाहीच, सुनावणी उद्यावर
Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी सुनावणी होणार आहे.
Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी सुनावणी होणार आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळली आहे. मुंबई सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार होती. पण आता आजच्याऐवजी ही सुनावणी उद्या घेतली जाणार आहे.
व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं गेल्या सुनावतीच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्त्य दाम्पत्य निवडून आलेलं आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे.
जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असं म्हणत राज्य सरकारनं आपलं उत्तर दाखल केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.