Mumbai Unlock : फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौरांनी दिले संकेत
"फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100% पूर्ण (Covid Vaccination) होईल अशी आशा आहे."
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होणार की काय? अशी भिती एकीकडे असतानाच आता मुंबईकरांसाठी सुखद बातमी आहे. मुंबई शहरात दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा (corona patients) दर आटोक्यात आला आहे. कोरोनाचा कहरही कमी होतोय. त्यामुळे, मुंबईच्या धावत्या चाकांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. कारण महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pendnekar) यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौर म्हणतात...
"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईनं लसीकरणाच्या साथीनं कोविडवर नियंत्रण मिळवलं आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100% पूर्ण (Covid Vaccination) होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला (Task Force) अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात." अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक (mumbai muncipal corporation elections) तोंडावर आहे. त्यामुळे मुंबईत राजकिय घडामोडींनाही गती येतेय.त्यामुळेच या महिन्याअखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररेज सरासरी 500 कोरोना रुग्ण आढळत आहेत. हा आकडा कोरोनानं मुंबईत थैमान घातलं होतं, त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका प्रशासनानं दिलेत.
अतिरिक्त आयुक्त म्हणतात..
फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर 100 टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरात दैनंदीन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आला आहे. सध्या शहरात दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.
फेब्रुवारी अखेर काय अनलॉक होणार?
-मुंबईतला तिस-या लाटेतला कोरोनाचा कहर आता ब-यापैकी कमी झालाय.
-त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत.
-ती पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळणार.
-सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये परवानगी
-लग्नसमारंभासाठी सध्या 200 जण उपस्थित राहण्यास परवानगी
-ही मर्यादा हटवणार
आठवडाभरात मुंबईत होणार 100 टक्के लसीकरण
मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण इतके जास्त होते की, डिसेंबरच्या सुरुवातीला 200 ते 250 पर्यंत नोंदवली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट 20 हजारांवर पोहोचली. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा निर्बंध कठोर करावे लागले. मात्र सर्वाधिक रुग्णवाढीची तिसरी लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी उठवली आहे. शिवाय चौपाट्या, मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट सध्या 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. येत्या आठवडाभरात मुंबईत 100 टक्के लसीकरण होणार असून मुंबईत पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे. तर दुसरा डोस 96 टक्के पूर्ण झाला आहे. 18 वर्षांपुढील वयोगटातील सर्व सुमारे 92 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल. तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील 9 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 3 लाख जणांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाची आकडेवारी पाहता मुंबई संपूर्ण अनलॉक व्हायला काहीच हरकत नाही...
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- New Corona Guidelines : राज्यासह मुंबईतही कोरोना निर्बंध शिथील; पाहा काय सुरु, काय बंद?
- Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा विळखा सैल, दिवसभरात 356 कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण दुपटीचा दर 760 दिवसांवर