(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याणमधील तरुणीची झेप! अमेरिकेच्या स्पेस टुरिझम 'न्यू शेफर्ड'च्या यान बनवणाऱ्या टीमची सदस्य
अंतराळ क्षेत्रात 'न्यू शेफर्ड' अंतराळ सफरचे लाँचिंग एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजलचा समावेश असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कल्याण : अंतराळ, स्पेस सायन्स, रॉकेट यांचं आकर्षण सर्वानाच असतं. मात्र आकर्षणाच्या पलिकडे जात कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने मोठी झेप घेतली आहे. अंतराळात झेपावणारे यान बनवणाऱ्या टीममध्ये कल्याण पूर्वमधील संजल गावंडे य तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण शहराची पताका थेट अंतराळात आणि पर्यायाने अमेरिकेत फडकली आहे. अमेरिकेमधील 'ब्ल्यू ओरिजिन' या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे.
येत्या 20 जुलैला या कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणमधील संजल गावंडे हिचा समावेश आहे. इंजिनीअरीगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजल हिने या उंचीवर झेप घेतली आहे.
संजलच्या या यशामुळे तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजल हिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत.अतिशय कठीण परिस्थितीत तिने हे यश मिळवल्याचे तिच्या आईने सांगितले. कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स याच्या सारखे अंतराळात जाण्याचे संजलचे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार, असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
अंतराळ क्षेत्रात 'न्यू शेफर्ड' अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजलचा समावेश असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
काय आहे 'न्यू शेफर्ड'?
आतापर्यत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीच यान सोडले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत 'स्पेस टुरिझम' अर्थातच अंतराळ सफर नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यासाठी 'ब्ल्यू ओरिजिन' ही कंपनी काम करत असून अंतराळ पर्यटकांसाठी 'न्यू शेफर्ड' नावाचे त्यांचे यान 20 जुलैला अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहे.