Mumbai Municipal Corporation | मोफत लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या एफडी मोडाव्या, खासदार राहुल शेवाळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी, विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई : येत्या 1 मे पासून महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निधी देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत 18 वर्षांवरील सर्वांना राज्य सरकारमार्फत मोफत कोरोना लस देण्यात यावी. यासाठी साधारण साडे पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 79 हजार कोटींच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत. राज्य सरकारने मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या या निधीचा वापर करावा. तसेच राज्य सरकारने पालिकेचा हा निधी काही वर्षांनी परत द्यावा, असेही खासदार शेवाळे यांनी सुचविले आहे.
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज
केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला परवानगी दिली आहे. याची सुरुवात 1 मे पासून संपूर्ण देशभरात होणार आहे. तसेच 1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार? अशी चिंताही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मोफत लसीकरण आणि लसींचा तुटवडा हे प्रश्न ऐरणीवर असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण नेमकं कसं होणार यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. मात्र, लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देत आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांत जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, पण जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल."