Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एक दिवस आधीपासूनच भक्तांची रांग, मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासून चरणस्पर्शाला सुरूवात
Lalbaugcha Raja 2023 : गणेशोत्सवाची तयारी सध्या सुरु असून भक्तांच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी आतापासूनच रांग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणस्पर्शासाठी भाविकांनी आतापासूनच रागं लावल्याचं चित्र सध्या लालबाग परिसरात आहे. मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी पहाटे पाच वाजल्यापासून चरणस्पर्शला सुरुवात होईल. पण त्याआधीच राजाचं चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांनी मोठी रांग लावल्याच पाहायला मिळतंय. काही भाविक तर चक्क गुजरात, बोरीवली, ठाणे आणि वसई-विरार परिसरातून दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून दर्शन रांगांची चोख व्यवस्था करण्यात येते. यामध्ये ज्या लोकांना राजाचे चरणस्पर्श करायचे असेल त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद केली जाते. तर मुखदर्शनाची रांग ही वेगळी असते. अवघ्या काही तासांमध्ये राजाच्या दर्शनला सुरुवात होईल. पण त्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
लालबागचा राजाला भाविकांची गर्दी
लालबाग परिसर सध्या गणेश भक्तांच्या उत्साहाने सजल्याचं चित्र आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी देखील भाविकांनी दर्शन रांगेसाठी गर्दी केली आहे. अवघ्या काही तासांनी लाडक्या बाप्पाचं आगमन होईल. पण त्याआधीच बाप्पाच्या आगमनासाठी लालबागनगरी सज्ज झालीये.
असा आहे राजाचा दरबार
यंदा लालबागच्या राजाच्या मंडपात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचनिमित्ताने यंदा राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलाय. या देखाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंची ही अखेरची कलाकृती आहे.
काहीच दिवसांपूर्वी राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा हा नृत्याविष्कार करुन सादर करण्यात आला. तर हा सोहळा पाहण्यासाठी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. तर यावेळी आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलीये.
लालबागचा राजा आणि भक्तांचं विशेष नातं आहे. नवासाला पावणारा गणपती म्हणून राजाची विशेष ख्याती आहे. त्यामुळे त्याच्या चरणी प्रत्येकजण लीन होतो. बुधवार (7 जून) रोजी लालबागच्या राजाचा मुहू्र्त पूजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर राजाचा मंडप सजवण्याची तयारी सुरु झाली. गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी मुंबईत येतात. लालबागच्या राजाकडे मागितलेल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे दर गणेशोत्सवात लालबागला राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. तर यंदा देखील अशीच गर्दी लालबागच्या राजाच्या मंडपात पाहायला मिळणार यात शंका नाही.