(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किशोरी पेडणेकरांच्या सासूचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, माझ्या कुटुंबातील बळी घेतला, पेडणेकरांचा हल्लाबोल
Mumbai News : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Mumbai News : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजया पेडणेकर यांनी काल 30 ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला. किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या SRA घोटाळ्याच्या आरोपानंतर चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांनी केला आहे.
माझा कुटुंबातील एक बळी घेतला. तरीही मी 1 नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांबाबत एबीपी माझाने किरीट सोमय्या यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार
किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आणि दादर पोलिसांच्या चौकशी सत्राबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे. गोमाता नगर (Gomata Nagar)एसआरए प्रकल्पातील गाळ्यांबाबत किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर सहा गाळे हडपल्याचे आरोप केले आहेत.
याच प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तीनजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातही आरोपींच्या जबाबात किशोरी पेडणेकरांचे नाव समोर आले आहे. मात्र, जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता खोटे आरोप केले जात असल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे. याबाबत किशोरी पेडणेकर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.
किशोरी पेडणेकर यांची चौकशी
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्यांकडून दररोजच आरोपांच्या फैरी झडत आहेत. आधीच झालेल्या SRA संबंधित घोटाळ्यात आरोपानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर याच एसआरए प्रकल्पातील सहा गाळे पेडणेकरांनी हडपले असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला. आता याच प्रकरणात खोट्या सह्या करुन नातेवाईकांच्या नावे घोटाळा केल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्यांच्या आरोपानंतर पेडणेकर स्वत: टाळं घेऊन गोमाता नगरात
किरीट सोमय्यांच्या सततच्या आरोपांनंतर आणि दादर पोलीस स्थानकातील चौकशीनंतर, किशोरी पेडणेकरांनी थेट आरोप होत असलेल्या वरळी गोमाता नगरमधील एसआरए इमारतींमध्ये हजेरी लावली. किरीट सोमय्यांकडून किशोरी पेडणेकरांनी येथील सहा गाळे अनधिकृतरित्या हडपल्याचा आरोप झाला होता. याच ठिकाणच्या गाळे धारकांना इथे माझा काही संबंध आहे का असा थेट सवाल करत किशोरी पेडणेकर कुलुप-चावी घेऊन गोमाता नगरमध्ये फिरल्या.