मुंबईतील प्रत्येक चाळवासियाला इथं राहावसं वाटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं कौतुक केलं. ते इतर कामांमुळे कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाहीत. मात्र, त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : "मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन महत्वकांक्षी प्रकल्प, अभिमान वाटेल अशा पद्धतीने तयार होईल. त्यातील रहिवाशांचं व्यवस्थितरित्या पुनर्वसन करु. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पातून रहिवाशांच्या चांगल्या घराची स्वप्नं, आशा पूर्ण होणार आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रत्येक चाळवासियाला इथं रहावंस वाटेल, अशा पद्धतीनं वरळी बीडीडी चाळीचं पुनर्वसन होईल.", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं कौतुक केलं. अजित पवार त्यांच्या इतर कामामुळे कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाहीत. मात्र त्यांनी विडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रकल्पाबाबत बोलताना, अजित पवार म्हणाले की, "मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा रहिवाशांची चांगल्या घरासंदर्भातील स्वप्नं, आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणारा आदर्श प्रकल्प असेल. मुंबईतील प्रत्येक चाळवासियाला आपलंही अशा पद्धतीच्या घरात पुनर्वसन व्हावंसं वाटेल. महाविकास आघाडी सरकारलाही अभिमान वाटेल, अशा पद्धतीनं हा प्रकल्प राबवून वेळेत पूर्ण केला जाईल. याबाबत तशा सूचना देखील म्हाडाला दिल्या आहेत."
दरम्यान, मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतींच्या बांधकामांचा शुभारंभ काल (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महाविकास आघाडीच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना नवीन टॉवरमधील घरांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचं प्रमुख केंद्र असलेल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली स्नेह, आपुलकीची भावना, मुंबईतील चाळसंस्कृती, नव्या टॉवरमध्ये आणि पुढच्या पिढीमध्येही कायम राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या मान्यवरांनी, महाराष्ट्रातल्या असंख्य राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लेखकांनी, खेळाडूंनी, कलावंतांनी मुंबईतील चाळसंस्कृतीत राहूनच राज्याच्या प्रगतीत योगदान दिलं. मुंबईतील चाळसंस्कृती हे राज्याचं सामाजिक, सांस्कृतिक वैभव असून या सांस्कृतिक वैभवातला स्नेहभाव नव्या टॉवरसंस्कृतीतही जपला जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सर्वसामान्य माणसाचं घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत : मुख्यमंत्री