सर्वसामान्य माणसाचं घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत : मुख्यमंत्री
सर्वसामान्य माणसाचं घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीडीडी चाळ पुनर्वसन बांधकाम शुभारंभप्रसंगी दिलंय.
मुंबई : आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावत आहोत. प्रत्येकाला आपलं मुंबईत घर असावं असं वाटतं. यानिमित्ताने आता सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या अनेक शहरात आम्ही लॉटरीच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन बांधकाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन बांधकाम शुभारंभप्रसंगी मा. मुख्यमंत्री यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्त या दोघाही महापुरुषांना वंदन करतो.
- आजच्या दिवशी एका चांगल्या कार्याची सुरुवात होत आहे.
- आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात मी मुख्यमंत्री होईल याचे देखील कधी स्वप्न पाहिलं नव्हतं, पण आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतोय याचा मला खूप आनंद आहे.
- येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय.
- बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे.
- आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.
- स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये लोकांना हक्काचे घर आहे की नाही, ही खंत कोणी व्यक्त करायची? आज आम्ही हे आव्हान स्वीकारले असून या स्वराज्यात स्वतःचं हक्काचं घर आम्ही देत आहोत.
- गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली.
- माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहितीये.
- उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका.
- माझं कुटुंब माझं घर ही भूमिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. आणि या घरांची चावी देण्याचा कार्यक्रम देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते पार पडेल.
हा प्रकल्प देशासाठी खूप महत्त्वपूर्ण राहील : आदित्य ठाकरे
हा प्रकल्प देशासाठी खूप महत्त्वपूर्ण राहील. मागच्या मुख्यमंत्र्यांनी देखील घाई घाईत नारळ फोडला होता. मात्र, पुढं काय झालं माहिती नाही. आता हा प्रोजेक्ट कार्यान्वित होत आहे. आम्ही स्थानिक नेत्यांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. आणि या रखडलेल्या प्रोजेक्ट बाबत त्यांना माहिती दिली होती. आता या प्रोजेक्टचं काम सुरू होत आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी येऊन आम्ही कामाची माहिती घेणार आहोत. पुढील 36 महिन्यात नागरिकांना आपल्या घरात राहायला जाता येणार आहे. याठिकाणी सॅम्पल फ्लॅट देखील उभारण्यात आला आहे. 36 महिन्यात हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे. आम्ही नागरिकांच्या प्रत्येक अडचणींचा विचार करून हा प्रोजेक्ट तयार केला आहे.
कोरोना काळात देखील अशा प्रकारचा उत्कृष्ट प्रोजेक्ट उभा राहणे हे कौतुकास्पद आहे : अस्लम शेख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यसम्राट मुख्यमंत्री आहेत. कारण कोरोना काळात देखील अशा प्रकारचा उत्कृष्ट प्रोजेक्ट आता उभा राहत आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. आज सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न पूर्ण होत आहे. या पाच वर्षात कोस्टल रोडचा दौरा एकत्र करण्याची इच्छा माझी आणि आदित्य ठाकरे यांची आहे. आम्ही केवळ कागदी काम न करता प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आहोत.
बाळासाहेब थोरात
राजू वाघमारे मला 5 वर्षांपूर्वी भेटले. त्यावेळी याचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी तत्कालीन सरकारने त्यांना अटक केली होती. मात्र, आता ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी आता आमच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगितलं आहे.
जितेंद्र आव्हाड
या बीडीडी चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. अण्णाभाऊ साठे देखील याठिकाणी येऊन गेले होते. दादर सोडलं की हाजीअली पर्यंत मोठ्या मोठ्या गिरण्या होत्या.