Andheri Bypolls: निवडणूक आयोगाचा भन्नाट प्रयोग; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत 'व्होट फ्रॉम होम'ला चांगला प्रतिसाद
Andheri Bypolls Vote From Home: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयोगाची चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत 'घरातून मतदान' याची सुविधा दिली होती. याचा 392 मतदारांनी लाभ घेत मतदान केले.
Vote From Home: राजकीय कारणांमुळे मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri Bypoll 2022) चर्चेत आली होती. ही निवडणूक आणखी एका खास कारणाने चर्चेत आली. निवडणूक आयोगाने (Election Commission)या पोटनिवडणुकीसाठी 'व्होट फ्रॉम होम' (Vote From Home) अर्थात घरातून मतदाना करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाला चांगले यश मिळाले. 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील नोंदणीकृत 392 मतदारांनी 'घरातून मतदान' या सुविधेचा पर्याय निवडून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शारीरिकदृष्ट्या अपंग आणि 80 वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती अशी माहिती या विभागातील निवडणूक अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.
देशाच्या निवडणूक इतिहासात प्रथमच, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'घरातून मतदान' हा उपक्रम राबवण्यात आला.
'व्होट फ्रॉम होम'ची अशी झाली तयारी
निवडणूक अधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 80 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 7000 मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली होती. या यादीतील सर्व मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेची माहिती देण्यात आली. या सुविधेअंतर्गत नोंदणी करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता.
या पर्यायांतर्गत 430 ज्येष्ठ मतदारांनी घरबसल्या मतदान प्रक्रियेसाठी आपली नावे नोंदविण्याचे मान्य केले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सात जणांच्या पथकाने ज्येष्ठ नागरिकांच्या घरी तात्पुरती मतदान केंद्रे उभारली. या तात्पुरत्या मतदान केंद्रात ज्या घरातील ज्येष्ठांनी आपली नावे नोंदवली होती त्यांनी 'गुप्त मतदान' स्वरूपात मतदान केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकांनी दिलेली मते सीलबंद करून जमा करण्यात आली. अंधेरी पूर्व मतदारसंघातील 430 नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी 392 मतदारांनी घरबसल्या मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच, या विशेष प्रवर्गात सुमारे 91.16 टक्के मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.
अनेकदा, वयोमान, आजारपण आदी कारणांमुळे अनेक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी घटण्यातही दिसून येतो. निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेमुळे वृद्ध, आजारी व्यक्तींना घरातून मतदान करता येणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. 'घरातून मतदान' हा उपक्रम केंद्रीय निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.