Balasaheb Thackeray | बाळासाहेबांचा आठवा स्मृतीदिन, शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर गर्दी न करण्याचं आवाहन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत. कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साडेअकराच्या सुमारास शिवतीर्थावर येऊन आदरांजली वाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच काही शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचं कळतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करु नका, आपल्या घरातूनच त्यांना अभिवादन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना केलं आहे. तसंच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी फार कोणाला प्रवेश देऊ नका, अशी सूचनाही मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. मातोश्री या निवासस्थानी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
स्मृतीदिनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करुया : अजित पवार दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी म्हटलं आहे की, "शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया."