ड्रेस कोडनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक नियम; कॉरिडोर किंवा लॉबीत चहा-कॉफी पिण्यास मनाई
मंत्रालयात ड्रेस कोड लागू केल्यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक नियम जारी केला आहे. कॉरिडोर किंवा लॉबमध्ये उभं राहून चहा-कॉफी पिण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयानंतर आता त्यांना शिस्त लावण्यासाठी आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी लॉबी किंवा कॉरिडोरमध्ये उभं राहून चहा पिऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या लॉबीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही वेळी चहा पिताना आढळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी कॉरिडोरमध्ये चहा न पिण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो. परिणामी जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत राज्य सरकारने तीन आठवड्यांपूर्वी आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला होता. महत्त्वाचं म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करुन येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
यानंतर आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लॉबी किंवा कॉरिडोरमध्ये उभं राहून चहा न पिण्याचे आदेश दिले आहे. राज्यभरातून अनेक नागरिक आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येतात. अशावेळी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या लॉबीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही वेळी चहा पिताना आढळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी हे आदेश देण्यात आले आहेत.