प्रॉपर्टी हडपण्यासाठी खोटं मृत्यूपत्र दाखवत षडयंत्र रचलं, शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंच्या संपत्तीवरून वाद चिघळले
शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंच्या संपत्तीवरून वाद चिघळले, प्रॉपर्टी हडपण्यासाठी खोट्या मृत्यूपत्राचा आधार घेतल्याचं समोर
डोंबिवलीतील शिक्षणमहर्षी कै. शिवाजीराव जोंधळे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोट्या मृत्यूपत्राचा आधार घेऊन षड्यंत्र रचल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांच्या पहिल्या पत्नी वैशाली जोंधळे, त्यांचे दोन मुलगे सागर व देवेंद्र जोंधळे, तसेच वकील, डॉक्टर, आणि साक्षीदार यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या अध्यक्षा आहेत. वर्षा देशमुख यांनी 31 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली की त्यांच्या वडिलांचे खोटं मृत्यूपत्र तयार करून मालमत्तांवर बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या तपासात मृत्यूपत्र नॉटरी करण्यात आलेले असून त्यावरील सही खोटी असल्याचे दिसून आले. शिवाय, 13 मार्च रोजीच्या मोबाईल लोकेशनमधून शिवाजीराव जोंधळे मुंबई फोर्ट परिसरात नसल्याचे स्पष्ट झाले.
कसं आलं प्रकरण उघडकीस?
शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख (वर्षा शिवाजीराव जोंधळे )या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्ट च्या अध्यक्षा आहेत. वर्षा या शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे .शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू दिनांक 19 एप्रिल 2024 ला झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी, त्यांची दोन मुले यांनी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करित दमदाटी करण्यास सुरवात केली. त्यावेळेस अनेक शेतजमीनींचे शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या शेतजमिनी नावावर करण्यासाठी एका मृत्यूपत्राच्या आधारे वारस लावण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यावेळेस वर्षा यांनी असे कुठलेही मृत्यूपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचे त्यांना सांगितलेले नसल्याने त्यांना हे मृत्यूपत्र बोगस असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याबाबत खात्री करण्यास सुरवात केली. दिनांक 13 मार्च 2024 ला हे नोंदणीकृत मृत्यूपत्र नॉटरी केल्याचे लक्षात आले मात्र त्यावर असलेली सही ही खोटी असल्याचे देखील वर्षा यांच्या लक्षात आले. तसेच वडिलांचा 13 मार्च चा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवलं असता शिवाजीराव जोंधळे हे 13 मार्च रोजी मुबंई फोर्ट परिसरात गेले असल्याचे निदर्शनास आले नाही.
डुप्लिकेट मृत्युपत्रावरून संपत्ती हडपण्याचा आरोप
आझाद मैदान पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी वैशाली जोंधळे, सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वकील ऍड. निलेश मांडवकर, नोटरी वकील टी. सी. कौशिक, डॉक्टर अरुण भुते, साक्षीदार किशोर जोंधळे आणि चैतन्य बडवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान, सागर जोंधळे यांनी डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात वर्षा देशमुख आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू डुप्लिकेट मृत्युदाखल्याच्या आधारे दाखवून संपत्ती हडपण्याचा आरोप केला आहे. त्यांनी शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येचा संशयही व्यक्त केला आहे.