इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी झुंज देऊन 'ती' पुन्हा जगतेय आयुष्य! सलग 5 वर्षात 11 शस्त्रक्रिया
अपघातात डोक्याला दुखापत झालेल्या मुंबईतील तरूणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश.सलग पाच वर्षांत तिच्यावर 11 वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोहिनुर रूग्णालयात हे यशस्वी उपचार करण्यात आले.

मुंबई : अपघातानंतर एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. असंच काहीस मुंबईत राहणाऱ्या 24 वर्षीय निरमोही या तरूणीच्या बाबतीत घडलंय. रस्ते अपघातात या तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली होती. तिला 45 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सलग पाच वर्षांत तिच्यावर 11 वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जगण्याची कुठलीही उमेद नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने मृत्यूशीही झुंज जिंकलीय. आणि आता ती पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू लागली आहे.
मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2015 मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असताना कालिना येथे घरासमोरील रस्त्यावर तिला अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी तिला नजीकच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतु, प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने तातडीने तिला कोहिनूर रूग्णालयात हलविण्यात आले. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यर यांच्याकडे उपचार सुरू झाले. अपघातात डोक्याला इजा झाल्याने ती कोमात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून धक्का बसला. मुलीचा जीव वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. साधारणतः शस्त्रक्रियेनंतर 15 दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. मात्र, तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी 11 वेळा डोक्यावर शस्त्रक्रिया केल्या. फेब्रुवारी 2020 मध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तिची प्रकृती उत्तम आहे.
कोहिनूर रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यर म्हणाले की, या रूग्णालयात आणले तेव्हा या मुलीची प्रकृती खूपच नाजूक होती. मेंदूची सीटीस्कॅन तपासणी केली असता या अपघातामुळे तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले. डोक्याची टाळू उघड करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः 45 दिवस तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 11 वेळा डोक्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय नियमित फिजिओथेरपी आणि स्पिच थेरपी देण्यात येत आहे. आता तिची प्रकृती उत्तम असून ती आधीप्रमाणे भरतनाट्यम नृत्य करू शकतेय.
डॉ. अय्यर पुढे म्हणाले की, मेंदूला इजा झाल्यास रूग्ण बरा होऊ शकत नाही, हा गैरसमज आहे. कुठल्याही अपघातात डोक्याला दुखापत झाल्यास पुढील 1-2 तासात रूग्णाला प्राथमिक उपचार मिळणं गरजेचं असते. खासगी रूग्णालयात रूग्णावर लगेच उपचार होणार नाही, अशी भिती अनेकांच्या मनात असते. परंतु, खासगी रूग्णालयात रूग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार दिले जातात. मेंदूला दुखापत झालेली असल्यास रूग्णाला बरं व्हायला वेळ लागतो. परंतु, या कठिण काळात कुटुंबियांची साथ खूपच महत्त्वाची असते. यामुळे रूग्ण लवकर बरा होऊ शकतो.
निरमोहिच्या आईने सांगितले की, अचानक मुलीचा अपघात झाल्याने आम्ही खूपच घाबरून गेलो होतो. मुलगी वाचण्याची शक्यता खूपच कमी दिसत होती. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे. याशिवाय, जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे मुलीने मृत्यूवर मात केली आहे. आता ती आधीप्रमाणे भरतनाट्यम करू लागली आहे. आणखीन एक शस्त्रक्रिया बाकी असून लॉकडाऊननंतर ती करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
