(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनानंतर मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मलेरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले
disease in rainy season : कोरोनाच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असतानाच आता आणखी एक संकट मुंबईकरांसमोर उभं राहिले आहे.
Malaria And Gastroenteritis : कोरोनाच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असतानाच आता आणखी एक संकट मुंबईकरांसमोर उभं राहिले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झफाट्याने वाढ होतच आहे, त्यात भर म्हणून पावसाळ्यातल्या साथीच्या आजारांचं प्रमाणही वाढायला लागलं आहे. मुंबईत सध्या कोरोनासोबतच मलेरिया आणि गॅस्ट्रोनंही थैमान घातलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
कोरोना महामारीसोबत लढतोय, त्याला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. मुंबईत गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सातत्यानं चढता राहीला आहे. सध्या राज्यात दररोज चार हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतेय. ज्यात सर्वाधिक वाटा मुंबईचा आहे. जवळपास 60 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आढळत आहेत. त्यातच आता साथीच्या आजाराही फोफावत आहेत. त्यामुळे मुंबई कोरोनासह इतर साथीच्या आजारांचाही हॉटस्पॉट ठरतेय. मुंबईत दररोज नव्या कोविड रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पार गेली आहे. त्यातच भर म्हणून मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये आठवडाभरात दुप्पट वाढ झाली आहे.
1 ते 12 जूनपर्यंत विविध आजाराच्या रुग्णांची संख्या
मलेरिया - 127
गॅस्ट्रो - 201
कावीळ - 26
डेंग्यू - 14
लेप्टो - 4
स्वाईन फ्ल्यू - 1
चिकनगुनिया - 0
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर साथीच्या आजारांनीही ताबडतोब हजेरी लावलीय. वांद्रे पूर्व, कुर्ला, माहीम, धारावी, वरळी या भागात मलेरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीसोबतच पावसाळ्यातील साथीच्या आजाराचेही मुंबईकरांसोबत संकट उभं राहिलेय. मुंबईकरांनी कोरोना महामारीसोबतच साथीच्या आजार होऊ नयेत, म्हणून काळजी घ्यायला हवी...
काय काळजी घ्यावी
गॅस्ट्रो एन्टेरिटिस सामान्यत: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. अतिसार, पेटके, मळमळ, उलट्या आणि ताप ही त्याची लक्षणे आहेत. अतिसार झालेल्या व्यक्तीने शौचाला जाऊन आल्यानंतर हात न धुतल्यास हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. थंडी वाजून ताप आल्यास तपासणी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईकरांनी घर आणि घराबाहेर बरेच दिवस पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीला आळा घालावा.
कोरोनासोबतच साथीच्या आजारांसोबत लढण्याकरता मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. गॅस्ट्रो-मलेरियाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र खाटा तयार ठेवल्या आहेत. गेल्या वर्षीही मुंबईत कोरोनासोबतच पावसाळ्यात मोठ्या संख्येने मलेरियाचे रुग्ण सापडले होते. मात्र यंदाची परिस्थिती त्यापेक्षाही बिकट आहे. त्यामुळे अखंड सतर्कता आणि नियमांचं काटेकोर पालन व्हायलाच हवं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )