Holi 2022 : होळी रे होळी!!! होळीच्या सेलिब्रेशनला कोळीवाड्यांमध्ये उधाण
आज देशभरात मोठ्या उत्साहात रंगाची उधळण होत असताना मुंबईच्या विविध कोळीवाड्यात उत्साहात होळीचे सेलिब्रेशन झाले.
Holi 2022 : मागील दोन वर्षे सगळ्यांच्या आयुष्याची होडी कोरोना संकटाच्या महासागरात हेलकावे खात होती. आयुष्याची ही होडी आता हळूहळू स्थिरावत आहे. आपण सारेच कोरोना संकटातून किनाऱ्यावर पोहचत असताना आता जवळपास दोन वर्षानंतर सण पुन्हा उत्साहात साजरे होत आहेत. दोन वर्षांनी यंदाची होळी सगळ्यांनीच आनंदात आणि उत्साहात साजरी केली. राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली गेली.
त्यात मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी तर अगदी दणक्यात साजरी केली जाते. कोळी बांधव होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वाईट प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळीचं दहण केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन करण्याची प्रथा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजे होळीच्या पूर्वसंध्येला कोळी बांधव होळी दहन करतात. कोळी समाजाच्या या होळीला कोंबड होळी असं म्हणतात.
अशी साजरी होते कोंबड होळी
कोंबड होळीला मुंबईतील वरळी, माहिम, वर्सोवा, कुलाबा, जूहू अशा सगळ्या कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साहाचं वातावरण असतं. कोळी बांधव सुपारीच्या झाडाची होळी लावतात. जिथे होळी लावली जाते त्या परिसरात रांगोळी काढली जाते. पताक्यांनी होळी सजवली जाते. आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा रोषणाईने सजवला जातो. होळीवर अनेक पदार्थ सजवले जातात. प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे त्याला कोणी मासे, चॉकलेट असे पदार्थ लावून होळी सजवली जाते. घरात गोड पदार्थ केले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांना लाप्सी, गोडधोड खाऊ घालतात. होड्यांना सजावट करुन त्याची पूजा करतात. कोळी महिला आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करुन, नटूनथटून यावेळी पाहायला मिळतात.
होलिका दहन
यावेळी सर्व कोळी बांधव होळीला देवीच्या रुपात सजवतात. तिला हळद लावून तिचा श्रृंगार केला जातो. होळी मातेची ओटी भरुन तिला नवस बोलला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. यावेळी सर्वचजण मजा-मस्ती करताना दिसतात. कुठे नाचगाणी, तर कुठे डीजेचा ताल, तर कुठे कोळी गाण्यांच्या ठेक्यावर महिला-पुरुष पारंपरिक नृत्य करतात. वरळीच्या कोळीवाड्यांमध्ये महिला मडकी डोक्यावर घेऊन संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढतात. ही मडकी डोक्यावर ऐकावर एक घेऊन त्यात दिवा लावलेला असतो आणि ही मिरवणूक काढल्यानंतर ती मडकी डोक्यावर घेऊन सगळ्या महिला होळीला पाच फेऱ्या मारुन ती मटकी होळी समोर फोडली जातात.
हे ही वाचा-
- Konkan Shimga Utsav : कोकणात शिमगोत्सवाचा न्यारा रंग! उत्साह अन् जल्लोषात सण साजरा
- Holi 2022 : तळकोकणातील आगळावेगळा शिमगोत्सव; सांगेलीत ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन
- Dhulivandan : आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; कुठलेही निर्बंध नाहीत पण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha