मुंबईत एकूण 222 गोविंदा जखमी, 197 जणांना डिस्चार्ज, तर 25 गोविदांवर उपचार सुरु
Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
Dahi Handi Festival 2022 : राज्यासह संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्ठमीसह दहीहंडी उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष सण-उत्सव निर्बंधांमध्ये साजरे करण्यात आले होते. अशातच यंदा मात्र सर्व निर्बंध उठवल्यामुळे दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक राजकीय नेत्यांसह, मंडळांनीही दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. एकीकडे दोन वर्षांनी राज्यात निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, तर दुसरीकडे दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईसह ठाण्यात एकूण 222 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 197 गोविंदांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 25 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत.
गोविंदांना आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता, भावनिक होऊन जाहीर केला : अजित पवार
दहीहंडी उत्सव आणि गोविंदांना आरक्षण देण्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं."उद्या दहीहंडी आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडणे, असं म्हणत अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोमवारी (22 ऑगस्ट) मी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. गोविंदांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न केले नाही. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? मुख्यमंत्री ज्या ठाण्याचं प्रतिनिधित्त्व करतात, तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचं नाही, पण उद्या गोविंदाांना आरक्षण देऊन नोकरी देणार, मात्र जी मुलं-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय याबद्दल भूमिका नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. तिथे देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे. एकवेळ मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही. क्रीडा विभाग किंवा कोणाशी बोलले नाही. सर्वांशी बोलण्याची गरज असते, अशा शब्दात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलं नाही, फक्त एक खेळ जोडला : चंद्रकांत पाटील
यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलायला सुरु केलं जातं. आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील पाच टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना लागू आहे. याआधी जे खेळ यात होते, त्यात हा एक खेळ जोडला आहे. त्यात कुठलंही अधिकचं आरक्षण दिलेलं नाही, फक्त नवा खेळ जोडला आहे. कोणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. कोणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करुन समाजाची दिशाभूल केली जात आहे."