(Source: Poll of Polls)
Dahi Handi 2023 : गोविंदा आला रे आला! सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना महत्त्व द्या, दहीहंडी पथकांची मागणी
Gopal Kala 2023 : दहीहंडीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणी या गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे.

Dahi Handi 2023 : दहीहंडी (Dahihandi) उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी आता गोविंदा पथकांचा (Govinda Pathak) सराव जोरदार सुरु झाला आहे. बाळगोपाळांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ढाकुम्माकुमचा आवाज आतापासूनच सर्वांच्या कानात घुमू लागला आहे. दहीहंडी हा मुंबईतील मोठ्या सणांपैकी एक आहे. मुंबईत दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते. गोविंदा पथकांचे मनोरे आणि सेलिब्रिटींची मांदियाळी असे हे समीकरण आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडी आधी गोविंदा पथकांकडून काही मागण्या करण्यात येत आहेत. सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या, अशी दहीहंडी पथकांची मागणी आहे.
सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना महत्त्व द्या
कमी झालेल्या निर्बंधांमुळे गोविंदांमध्ये यंदा जल्लोषाचे वातावरण आहे. दहीहंडी फोडायला यंदा ही गोविंदा पथकं उत्सुक आहे. आयोजकांनी सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळंना महत्त्व द्यावं, दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना असावी, दहीहंडीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणी, या गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे.
दहीहंडी पथकांची मागणी
घाटकोपरचं क्रांती गोविंदा पथक हे आठ आणि नऊ थर लावण्यासाठी आणि अनोख्या संकल्पना करण्यास प्रसिद्ध आहे. फिरते थर, डोळे बंद करून थर लावणे, शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगणारे थर, देशभक्तीपर थर, वारकरी संप्रदाय दाखवणारे थर अशा अनेक हटके संकल्पना या पथकाने आतापर्यंत केल्या आहेत. यंदा देखील हे पथक आठ थरांची तयारी करीत आहे. दहीहंडीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणी या गोविंदा पथकाने केली आहे.
गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन याआधी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन निवेदन दिले होते.
यंदाही बालगोपाळांचा विमा उतरवण्यात यावा
या निवेदनात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांचा विमा उतरवण्यात यावा. दहीहंडी खेळाला साहसी दर्जा देण्यात आला आहे. परंतु याबाबत सरकारमार्फत उपाययोजना झालेली नाही, तरी साहसी खेळासाठी आपण पुढाकार घेऊन सरकार आणि दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी. आयोजकांवर ज्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत, त्या शिथील कराव्यात अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.




















