मुंबईच्या दादर फूल मार्केटमधील हत्येचा उलगडा
मृत व्यक्तीच्या पत्नीसोबतची मैत्री आणि एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मुंबई : दादरच्या फूल मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार करुन मनोज मौर्या या व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीसोबतची मैत्री आणि एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी राधेकृष्ण खुशवाहसह राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाहला दिल्लीतून अटक केली आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या आरोपी राधेकृष्णने राजेंद्र आणि हेमंतला मनोजच्या हत्येची 50 हजारांना सुपारी दिली होती. या दोघांनी मुंबईत येऊन मनोजची हत्या केली आणि पुन्हा दिल्लीला फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मृत मनोजची पत्नी आणि आरोपी राधेकृष्ण दिल्लीतील एका कंपनीत एकत्र कामाला होते. त्याठिकाणी त्यांची मैत्री झाली होती. मात्र या दोघांची मैत्री मनोजला मान्य नव्हती, त्यामुळे 2017मध्ये मनोज आपल्या कुटुंबियांस मुंबईत आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मात्र मुंबईत आल्यानंतरही राधेकृष्णने मृत मनोजच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावरून मृत मनोज आणि राधेकृष्ण यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. आरोपी राधेकृष्णला मनोजच्या पत्नीसोबत एकतर्फी प्रेम झालं होतं आणि तिला मिळवण्यासाठीच त्याने मनोजची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर फूल मार्केटमध्ये 12 ऑक्टोबरला मनोजची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दादर फूल मार्केटमध्ये मनोज डिजिटल वजन काट्याचा व्यवसाय करत होता. मनोजच्या पत्नीने एमबीएपर्यंत शिक्षण घेतलं असून खासगी कंपनीत नोकरीला आहे. दोघांचा एक मुलगाही आहे.