BMC मध्ये नोकरीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले, टोळीचा पर्दाफाश; एकाच कुटुंबातील चौघे अटकेत
एका टोळीने नोकरीच्या शोधात असलेल्या गरजू तरुणांची फसवणूक केली. बीएमसीमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली या टोळीने जवळपास 45 तरुणांची 2 कोटी 27 लाखांना फसवणूक केली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.

मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर मोठ्या संख्येत लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. लोक नोकरीच्या शोधात आहेत आणि याचाच फायदा घेत एका टोळीने गरजू तरुणांची फसवणूक सुरु केली. मुंबई महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक या टोळीने केली आहे.
मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने या टोळीचा पर्दाफाश केला. बीएमसीमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली टोळीने जवळपास 45 तरुणांची 2 कोटी 27 लाखांना फसवणूक केली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यात एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. प्रांजल भोसले (बीएमसी कर्मचारी), लक्ष्मण भोसले (महिलेचा पती), राजेश भोसले (प्रांजलचा दीर), महेंद्र भोसले (प्रांजलाचा दीर) अशी त्यांचं नावं आहे.
या प्रकरणात बीएमसीमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या काही ओळखीच्या लोकांची फसवणूक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गरजू लोकांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये आणि त्यांची मूळ कागदपत्रेही घेत होते.
यामध्ये आरोपी महिलेचा पती आणि दोन दिर सुद्धा सामील होते.
कोरोनाचं कारण सांगत त्यांनी अनेकांच्या ऑनलाईन (व्हर्च्युअल) मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र कोणालाही अपॉईंटमेंट लेटर दिलंच नाही. त्यानंतर हे लोक पळून गेले असता याबाबत नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रॉपर्टी सेलमार्फत तपास सुरु केला असता असे आढळले की मुख्य आरोपी ही महिला असून तिचं नाव प्रांजल भोसले आहे. प्रांजल भोसले बीएमसीच्या शिक्षण विभागात कार्यरत होती. तिच्यासह तिचा पती आणि दोन दिर यांचाही यात समावेश होता. आरोपी महिला ऑक्टोबर 2020 पासून फरार होती. आपल्या पतीसोबत ती गोव्यात भाड्याने राहत होती.
आरोपी महिला आणि तिचा पती हे दोघेही गोव्यातील एका गावात लपून बसले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि दोघांना अटक करुन मुंबईला घेऊन आले. त्यांची चौकशी केली असता आणखी दोघांची नावं समोर आली जे महिलेचे दिर होते. त्या दोघांना ठाणे आणि कल्याण परिसरातून अटक करण्यात आली. या टोळीने आणखी काही लोकांची फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्याव, त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितलं.
लोकांनी सावधगिरी बाळगावी. त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असताना सर्व बाबींची खतरजामा करुन घ्यावी आणि पैसे कोणाला देऊ नये, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
