Mumbai Dharavi vaccination | मेगाप्लान! १८ वर्षांच्या वरील धारावीकरांच्या लसीकरणाचे नवे मॉडेल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमोर सादर
खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. धारावीतील लसीकरणासाठीचा मेगाप्लान त्यांनी या पत्रातून सादर केला आहे.
Headlines Mumbai Dharavi vaccination आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्ण सापडले होते. तेव्हा आता धडकलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीमध्ये मोठी रुग्णसंख्या दिसण्याची भीती आहे. त्यामुळंच या भागातील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. धारावीतील लसीकरणासाठीचा मेगाप्लान त्यांनी या पत्रातून सादर केला आहे.
खासदार शेवाळे यांकडून धारावीतील १८ वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्याबाबतची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. धारावीत ८०% लोकसंख्या ही १८ वर्षांच्या वरील आहे, १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण केले तर कोरोना विषाणूवर मात करणे कितपत शक्य होते, विषाणूचा प्रभाव कमी करता येतो का याचा अभ्यास करणेही धारावी मॉडेल द्वारे शक्य होईल.
धारावीच्या लसीकरणाच्या या मेगाप्लानविषयी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, गटप्रमुख मिळून मतदार यादील बाराशेच्या प्रमाणं नागरिकांची यादी करुन, हाती असणाऱ्या लसी वापरात आणत 100 टक्के लसीकरणाचा एक अॅक्शन प्लान तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
'केंद्र सरकारनं मदत केल्यास धारावीतील लसीकरणाचं मॉडेल देशभरात आदर्श प्रस्थापित करेल', असं ते म्हणाले. राज्य शासन या मोहिनेसाठी अनुकूल असल्याचं म्हणत आता केंद्रानं धारावीसाठी वेगळा लसींचा पुरवठा दिल्यास साऱ्या देशासाठी ही बाबत महत्त्वाची ठरेल असंही राहुल शेवाळे म्हणाले. शहरात इतरही ठिकाणी झोपडपट्टी क्षेत्र आहे, त्या भागातही धारावी प्रमाणंच लसीकरणाची मोहिम राबवली तर त्याचा फायदाच होईल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.
केंद्रानं अद्याप पत्राचं उत्तर दिलेलं नसलं तरीही त्याबाबत अनुकुलता दर्शवली असल्याचं म्हणत दर दिवसाला या भागात जवळपास 1 हजार लसींची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या सुरु असणाऱ्या संचारबंदीच्याच काळात दर दिवशी 5 हजार या संख्येनं लसीकरण करण्यात आल्यास याच काळात धारावीत शंभर टक्के लसीकरण झालेलं असेल ही बाब राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केली. तेव्हा आता त्यांच्या पत्राला केंद्राकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या हाताबाहेर गेलेली असतानाही सरतेशेवटी अथक प्रयत्नानंतर धारावीनं कोरोना नियंत्रणात आला होता. हा धारावी पॅटर्न जगभरात लक्ष वेधून गेला. तेव्हा आता या भागा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिसण्यापूर्वीच काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.