(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मास्क वापरा.. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा! मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापरणं परिणामकारक ठरतं. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यासंदर्भात एक परिपत्रक काढलं असून मास्क न वापरणाऱ्यांर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मास्क न वारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.
मुंबई : कोविड-19 संसर्गासाठी लागू असलेली टाळेबंदी टप्प्या टप्प्याने शिथील करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु आहेत. मात्र, काही नागरिकांकडून कोविड-19 संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचंही दिसून येत आहे.
विशेषत: मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच दिले आहेत. आता या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार, कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथील करुन पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगीन अगेनची घोषणा केली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असं वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक आणि इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : मास्क वापरला नाही तर आता एक हजार रुपये दंड, खाजगी वाहनं, कार्यालयांमध्येही मास्क बंधनकारक
याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीनिशी मास्क लावणे बंधनकारक करुन नियम न पाळल्यास कारवाई करण्याचे परिपत्रक महापालिकेकडून जारी करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना मुखावरण (मास्क) लावणे हे अतिशय गरजेचे असून त्यामुळे संसर्गाला आटोक्यात ठेवणे शक्य आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर बाळगून आणि मास्क लावून वावरल्याने संसर्गाचा धोका अत्यल्प असतो, असे अभ्यासकांनी वारंवार नमूद केले आहे.
या परिपत्ररकानुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.
प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषधी दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करुन वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करु शकतात.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी रुपये एक हजार इतका दंड आकारण्यात येईल. पोलीस विभाग तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.
सर्व नागरिकांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करणे, सुरक्षित अंतराबाबतचे नियम पाळणे, आवश्यक सर्व ती खबरदारी घेणे हे नागरिकांचेदेखील कर्तव्य आहे. कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम
ठाण्यात लॉकडाऊनबाबत संभ्रमावस्था कायम, प्रशासनाकडून अधिकृत घोषणा नाही
मुंबईकरांनो, आवश्यक असेल तरच घरापासून दोन किलोमीटरच्या आतच फिरा; अन्यथा कारवाई होणार