COVID 19 Cases In Mumbai : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? 7 दिवसांत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 1300 वरुन 15 हजारांवर
COVID 19 Cases In Mumbai : मुंबईत कोरोना रुग्णांचा विस्फोट. अवघ्या सात दिवसांतच कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 1300 वरुन 15 हजारांवर पोहोचला आहे.
COVID 19 Cases In Mumbai : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येची समोर येणारी आकडेवारी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजार 166 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत बोलताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना, सध्या 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही, असं सांगितलं होतं. परंतु, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी काही कठोर निर्बंध लादण्याची गरज असल्याचंही यावेळी बोलताना स्पष्ट केलं होतं.
कोविड-19 टास्क फोर्स आणि राज्याच्या आरोग्य, नियोजन आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री म्हणाले की, राज्यात मंगळवारी 16,000 हून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी ही संख्या 25,000 वर पोहोचली.
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी
तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
21 डिसेंबर | 327 |
22 डिसेंबर | 490 |
23 डिसेंबर | 602 |
24 डिसेंबर | 683 |
25 डिसेंबर | 757 |
26 डिसेंबर | 922 |
27 डिसेंबर | 809 |
28 डिसेंबर | 1377 |
29 डिसेंबर | 2510 |
30 डिसेंबर | 3671 |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महत्त्वाची बाब म्हणजे, 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. केवळ 10 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत आहेत. त्यापैकी केवळ 2 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. टास्क फोर्सच्या शिफारशींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत घेतले जाईल, असे ते म्हणाले. मंत्री महोदयांनी लसीकरणावर भर दिला आणि सांगितले की, ज्यांनी अद्याप लसीकरण केलेले नाही, त्यांना तात्काळ इंजेक्शन देणे आवश्यक आहे आणि कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देणे आवश्यक आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रशासनाकडून निर्बंधाबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती असलेली इमारत सील करण्याबाबत मुंबई महापालिकेने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.
एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते पाचव्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron Cases In India: भारतातील 24 राज्यांत 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण, राजस्थानात एकाचा मृत्यू
- Corona Vaccine : Covaxin लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला, कारण काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह