(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोना बरा झाल्यानंतरही हॉस्पिटलच्या वाऱ्या कायम!
कोरोना बरा झाल्यानंतरसुद्धा काही लोकांनां आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. अशा लोकांकरिता महापालिकेने खास शहरातील विविध भागात महापालिकेच्या रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु केल्या आहेत.
मुंबई : कोरोना झाला होता, खूप संघर्ष आणि सगळे उपचार करून रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. मात्र त्यांचा लढा इथेच थांबत नाही तर काही रुग्णांना घरी गेल्यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास, अंगदुखी, मानसिक तणाव, हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्यामुळे पुन्हा रुग्णालयात जावे लागत आहे. काहींना फुफ्फुसाच्या व्याधी झाल्या आहेत. त्यांच्या फुफ्फुसांवर व्रण राहिल्यामुळे हा त्रास त्यांना जाणवत आहे. या आणि अजून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महापालिकेने खास 'पोस्ट कोविड' ( कोरोना झाल्यांनंतरच्या व्याधी) करीता खास (ओपीडि) रुग्ण बाह्यविभाग सुरु करण्यात आला आहे.
कोरोना बरा झाल्यानंतरसुद्धा काही लोकांनां आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. अशा लोकांकरिता महापालिकेने खास शहरातील विविध भागात महापालिकेच्या रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु केल्या आहेत.
नायर रुग्णलायचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, "गेल्या आठवड्याभरात जवळ पास 100 रुग्ण या ओपीडीमध्ये उपचाराकरिता येऊन गेले आहेत. त्यांच्या समस्या फार गंभीर नाहीत. मात्र अनेक जणांना काही मानसिक समस्या, अंगदुखी, फुफ्फुसाच्या समस्या आणि काहींना हृदयाशी संबंधित त्रास जाणवत असल्याचे दिसत आहे. आम्ही या ओपीडीमध्ये विविध विषयांचे तज्ञ येथे बसविले आहेत. ते या सर्व रुग्णांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे औषध देऊन उपचार करीत आहेत."
गेल्या महिन्यात 22 रुग्णांना फुफ्फुसाच्या व्याधी, म्हणजे श्वसनाचा त्रास झाल्याने पुन्हा परळ येथील केइएम रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. या सर्वांना घरी गेल्यानंतर काही काळाने श्वासोच्छवास घेण्याकरिता त्रास झाल्याने त्यांनी पुन्हा हॉस्पिटलचा मार्ग धरला. तेथे या सर्वांना दाखल करून घेण्यात आले असून सर्व जणांची चाचणी कोरोना निगेटिव्ह असून त्यांना नियमित रुग्णलयाच्या कक्षात उपचार दिले होते. गेले दोन महिन्यात हे रुग्ण येथे दाखल झाले असून त्यांना सर्वांना ऑक्सिजनवर ठेऊन उपचार देण्यात आले होते. यासर्व रुग्णांपैकी काही रुग्णांना घरी गेल्यानंतरही श्वसनाचा त्रास होऊन नये म्हणून ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा असे सांगण्यात आले आहे.
शास्त्रीय भाषेत या अशा व्याधींना पोस्ट इन्फेकशन फायब्रोसिस असेही म्हणतात. ज्या संसर्गामध्ये फुफ्फसांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आणि उपचारानंतर काही वेळा फुफ्फुसातील जखम बरी झाल्यानंतरही त्याचवरचे व्रण कायम राहतात. त्यावेळी थोड्या फार प्रमाणात फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावते. मग अशावेळी रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा वेळी त्यांना तात्पुरते रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार करून घरी जाता येते. मात्र अशा काही रुग्णांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागत असल्याचे दिसून येते.
"कोरोनामध्ये बहुतांश रुग्णांना फुफ्फुसांचा संसर्ग होतो. मात्र काही रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा मोठा सहभाग त्याच्या आजारात असतो. डॉक्टर त्यांना औषधांसोबत ऑक्सिजनही देत असतात. त्या उपचारादरम्यान काही रुग्ण जे अतिगंभीर असतात त्यांना अशा स्वरूपाचे फुफ्फुसांवर व्रण राहतात. त्यामुळे त्याना श्वास घ्यायला त्रास होतो आणि अशा स्वरूपाच्या तक्रारी दिसत आहेत. माझ्याकडे सुद्धा अशा स्वरूपाचे कोरोनाचे उपचार झाल्यांनंतरचे दोन रुग्ण आहेत. अशा पद्धतीचे रुग्ण यापूर्वी स्वाईन फ्लूच्या उपचारानंतरही दिसले होते. त्यामुळे अशा रुग्णांना उपचार करणे हा एकमेव पर्याय असतो. विशेष म्हणजे अशा स्वरूपाचे फार कमी रुग्ण येत असतात. प्रत्येकालाच ऑक्सिजनची मशीन लागेलच असे नाही, काही रुग्ण उपचाराने बरेही होतात." असे डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात, ते पुणे येथील एका खासगी रुग्णलयात श्वसनविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
काही दिवसापूर्वी कोरोनच्या दरम्यान परळ यथील बाई जेरबाई वाडिया लहान मुलांच्या रुग्णलयात कोरोनाचे उपचार सुरु असताना असाध्य आणि दुर्मिळ अशा पीआयएमएस (पीड़ियाट्रिक इंफ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम) आजाराची लागण झाल्याचे दिसले होते. ह्या आजारांवर डॉक्टर उपचार करीत असले तरी अशा पद्धतीचा आजार ओळखणे हे वैद्यकीय तज्ञांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महत्त्वच्या बातम्या :
- Coronavirus Reinfection | मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील चार जणांना पुन्हा कोरोना!
- खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ
- ठाण्यात एका दिवसात 5 हजारांहून अधिक चाचण्या; वाढलेल्या चाचण्यांमुळे रुग्ण संख्येत वाढ, पालिका आयुक्तांचा दावा
- मिशन बिगीन अगेनचा गैरफायदा, ठाण्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढली
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर ऑफिसेसच्या वेळा बदला, उपनगरीय प्रवाशी संघाची ठाकरे सरकारकडे मागणी