Coronavirus | ठाण्यात अत्याधुनिक वाहनांच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण
ठाणे महानगरपालिकेने शहरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यासाठी अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागवली आहेत. या वाहनाच्या साहाय्याने संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे शहरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी प्रभावीपणे करता यावी यासाठी महापालिकेकडून अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागविण्यात आली आहेत. आता महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या यंत्रणेबरोबरच या वाहनाच्या साहाय्याने संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे.
दरम्यान आज 1440 लीटर हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास 14 हजार लिटरची फवारणी करण्यात आली असून आतापर्यंत 10 टॅंकर्स, 10 ट्रॅक्टर्स, 10 बोलेरो, 5 टाटाएस आणि 125 हात पंप यासाठी 7 हजार 500 लीटर हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास 75 हजार लीटरची फवारणी करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : ठाण्यात अनेक ठिकाणी मशीनच्या साहाय्याने रस्त्यांचं निर्जंतुकीकरण
वागळे इस्टेटमधील युपीएल लि. या कंपनीने विनामूल्य ही वाहने उपलब्ध करून दिली असून या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी 40 फुटाच्या रस्त्याची फवारणी करणं शक्य होणार आहे. या वाहनाची गतीही पाच मिनिटाला एक किमी एवढी असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रफळामध्ये फवारणी करता येणार आहे. ही दोन वाहने शहराच्या विविध भागामध्ये फवारणी करतील. यातील एका वाहनाच्या माध्यमातून फवारणी सुरू करण्यात आली असून दुसरे वाहन उद्यापर्यंत ठाण्यात दाखल होणार आहे.
महापालिकेने मागविलेल्या या अत्याधुनिक वाहनांसोबत 10 ट्रॅक्टर्स, 10 टँकर्स, 10 बोलेरो, 5 टाटा एस आणि 125 हातपंपाच्या माध्यमातूनही फवारणी करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांवर या दोन वाहनांच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येणार असून छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून छोट्या वाहनांचा वापर करून फवारणी करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 पार गेला असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यूही झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत.
संबंधित बातम्या :
भारतावर कोरोनाचं सावट! देशात 1100 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; तर 27 जणांचा मृत्यू
Coronavirus | क्वॉरन्टाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी 'मुंबई आयआयटी'कडून क्वारंटाईन अॅपची निर्मिती