(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Strict Restrictions | कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध गरजेचे : डॉ. संजय ओक
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन व्हावा असंच मला सूचित करायचं आहे, असं मत महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओके यांनी व्यक्त केलं.महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लसीकरण तयारीचं नियोजन, निर्बंधांचा परिणाम याबाबत त्यांनी सरकारला सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक हे कडक लॉकडाऊनसाठी आग्रही आहेत. "सध्याच्या कडक निर्बंधबाबत मी समाधानी नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध आणखी कडक करणं गरजेचं आहे. पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन व्हावा असंच मला सूचित करायचं आहे," असं वक्तव्य डॉ. संजय ओक यांनी केलं. डॉ. संजय ओक यांनी 'एबीपी माझा'सोबत बातचीत केली. महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लसीकरण तयारीचं नियोजन, निर्बंधांचा परिणाम याबाबत सरकारला सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. संजय ओक म्हणाले की, "कालची आकडेवारी कमी झाली. त्यामुळे डाऊनवर्ड ट्रेण्ड सुरु झाला आहे, पण पुढील 10 ते 12 दिवस कडक नियम लागू करावे लागतील. कोरोनाचा हा स्ट्रेन खूप वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे नियम पाळवे लागणार आहेत. शिवाय काही नियमांबाबत सक्तीही करावी लागेल."
टास्क फोर्सने कोविड अप्रोप्रिएट बेहेवियरचा आग्रह, रेमडेसिवीर वापराबाबत सूचना, रोरो एक्स्प्रेसची कल्पना दिली. तसंच ऑक्सिजनचा वापर कसा करावा, नियोजन कसं असावं याबाबतच्या सूचनाही दिल्याचं डॉ. संजय ओक यांनी सांगितलं.
बॅचेसनुसार 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करावं लागेल : डॉ.ओक
येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. "18 वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण बॅचेसनुसार करावं लागेल जेणेकरुन गर्दी होणार नाही," असं डॉ. संजय ओक यांनी म्हटलं आहे. लसीकरणाच्या नियोजनासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याच्या सूचनाही आम्ही सरकारला दिल्याचं डॉ. ओक म्हणाले. "लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी तरुण स्वयंसेवक समोर येणे गरजेचं आहे. त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते या कामात सहकार्य करतील. आम्ही टास्क फोर्सच्या दोन बैठका घेऊ आणि महाराष्ट्रत लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवायचा याबाबत ठरवू. सर्वांनी एकत्र येऊन निदान जून महिन्याअखेरपर्यंत आपलं राज्य लसीकृत व्हावं यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लस मुबलक प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा आहे. थोडी धावपळ करावी लागेल," असं डॉ. ओक यांनी सांगितलं.
'रेमडेसिवीर ही एकमेव संजीवनी नाही'
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल असा विश्वास डॉ. ओक यांनी व्यक्त केला. मात्र "रेमडेसिवीर ही एकमेव संजीवनी नाही, त्याने जीव वाचतो किंवा तेच रामबाण उपाय आहे असं नाही. माझे महाडमधले मित्र डॉ. हिंमतराव बावसकर यांनी 850 पेक्षा जास्त ग्रामीण भागातील रुग्ण रेमडेसिवीरविना वाचवले आहेत. ऑक्सिजनला मात्र पर्याय नाही, ऑक्सिजनचा नियोजन ऑडिट करणं गरजेचं आहे," असं डॉ. ओक यांनी नमूद केलं.
"चिंतेची बाब म्हणजे 30 ते 40 वर्षे वयोगटातील तरुण रुग्णालयात येत आहेत आणि अनेक जण दोन दिवसात ते दगावत आहेत. कारण त्यांना रुग्णालयात यायला उशीर होतोय. आरटीपीसीआर टेस्ट करा, त्याला घाबरु नका. होम क्वॉरन्टीनसाठी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे," असं डॉ. ओक यांनी सांगितलं.
"30 एप्रिलपर्यंत कोरोना नियंत्रणमध्ये आणण्याचे प्रयत्न असतील. पण हे होईलच किंवा त्यानंतर कडक नियम लावले जावेत असं छातीठोकपणे सांगणे कठीण आहे. आपण स्वयंशिस्तीन नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचे आहे," असं ते पुढे म्हणाले.