Corona Effect | वडाळा जीएसबी सार्वजनिक मंडळ माघी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या परिस्थितीचा विचार करून गर्दी होऊ नये आणि प्रशासनावर सुद्धा या परिस्थितीत ताण निर्माण होणार नाही, यासाठी हा निर्णय जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे.
मुंबई : मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असलेल्या वडाळा राम मंदिराच्या जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाचा मुंबईतील वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेत यंदाच्या वर्षासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आपला गणेशोत्सव या भाद्रपदमध्ये साजरा न करता फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या माघी गणेश जयंतीला साजरा करण्याचं जीएसबी मंडळाने ठरवलं आहे.
दरवर्षी गणेशोत्सव काळात वडाळ्याच्या जीएसबी गणेश मंडळात दर्शन घेण्यासाठी दहा दिवस हजारोच्या संख्येने भाविक एकत्र येतात. त्यामुळे या कोरोनाच्या संकटात जर हा उत्सव साजरा केला तर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळून खबरदारी घेणं हे कठीण असून यासाठी सुरक्षारक्षक, पोलीस सुद्धा मदतीला लागतील.
पुण्यात यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने होणार, मानाच्या 5 गणपती मंडळांच्या बैठकीत निर्णय
या सगळ्या परिस्थितीचा विचार करून गर्दी होऊ नये आणि प्रशासनावर सुद्धा या परिस्थितीत ताण निर्माण होणार नाही, यासाठी हा निर्णय जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे. पुढल्या वर्षी माघी गणेश जयंती उत्सवात कोरोनाचा संकट गेल्यानंतर हा उत्सव साजरा करणार असल्याच मंडळ समितीचे ट्रस्टी सचिव मुकुंद कामत यांनी सांगितलं आहे.
मुंबईत कोरोनाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेत अखिल खेरवाडी सार्वजनिक मध्यस्थ गणेशमंडळाने सुद्धा यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करताना 2 ते 5 फुटांपर्यंतचा गणेशमूर्ती आपण यंदाच्या वर्षी सर्व खेतवाडीच्या 31 गल्ल्यांमध्ये बसवणार असल्याचं अध्यक्ष नलिन मोदी यांनी सांगितलं.
शिवाय, यावर्षी गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेऊन त्याप्रकरची नियमावली सुद्धा गणेशमंडळ आपल्या स्तरावर करत आहे. कोरोनाच्या संकटात साधेपणाने उत्सव साजरा करत वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा जपताना पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे आपण शासनाशी याबाबत चर्चा करत असून शासनाकडून जी नियमावली येईल त्यानुसार सर्व मंडळांना विश्वासात घेऊन आपण येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत योग्य तो निर्णय घेऊ. शिवाय इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नये, असं मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे.