Sanjay Raut : स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर निर्णय घ्यावा : संजय राऊत
कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ हिच शिवसेनेची भूमिका आहे. राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली भूमिका ओळखली पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यासोबतच विरोधकांची पोटदुखी आहे, त्याला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार असल्याचंही ते बोलताना म्हणाले. त्यासोबतच विरोधकांची पोटदुखी आहे, त्याला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल अशी आशाही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ हिच शिवसेनेची भूमिका आहे. राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली भूमिका ओळखली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "भ्रम राहता कामा नये. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळ वैगरे काय आहे त्यासंदर्भात निर्णय घ्यावा. पण शिवसेनेविषयी म्हणाल झालं तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल महाराष्ट्रातील जनतेला, लाखो शिवसैनिकांना ही दिशा दिली आहे, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईस कायम तयार आहे. बळावर, स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर..."
शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दादर-माहिम परिसरात झालेल्या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "या प्रकरणाचा संबंध संस्कृतीशी जोडू नका. संस्कृतीचा काहीही संबंध नाही. अंगावर याल तर शिंगावर घेऊ, महाराष्ट्राची संस्कृतीच आहे ना. महाराष्ट्र कधी कोणाच्या वाट्याला जात नाही आधी, शिवसेनासुद्धा. पण जर कोणी अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे या राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखली पाहिजे. राजकारणासाठी राजकारण आणि विरोधासाठी विरोध हे सध्या करु नये. उद्धव ठाकरेंनीदेखील हेच सांगितलं आहे. सध्याच्या काळात राजकारण करणार असाल, राडेबाजी करणार असाल तर लोकं चपलेनं मारतील, हे आपल्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगावं लागलं, यातचं सगळं आलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सत्ता नसल्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुरु झाली आहे. त्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पोटात घ्यायचं औषध दिलं आहे. उगळून लावायचं नाही. त्यामुळे आता हळूहळू आजार बरा होईल."
दरम्यान, काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर काल (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :