(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावरकर वादानंतर काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच 'मातोश्री'वर येण्याची शक्यता
Maharashtra Politics: राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता असून दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मोठ्या प्रमाणावर डॅमेज कंट्रोल सुरू आहे असं दिसत आहे. कारण राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच मातोश्रीवर (Matoshree) येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याची नेमकी तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या काही दिवसांत ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Election 2024) चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात होतं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यासाठीच होत असल्याच्याही सध्या चर्चा रंगल्या आहेत.
कधी होणार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट?
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसंदर्भात चर्चा होणार आहे. याचवेळी भेटीची तारीखही निश्चित केली जाणार आहे. एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकते.
गेल्या अनेक दिवसांपासून 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी देशभरातील अनेक विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. तसेच, काल (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही राहुल गांधींनी दिल्लीत भेट घेतली. अशातच आता राहुल गांधी स्वतः मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पहिल्यांदाच कोणीतरी गांधी कुटुंबातील व्यक्ती स्वतः मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगावच्या पाचोऱ्यात सभा
उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिल रोजी जळगावच्या पाचोरा येथे विराट सभा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. 'महाविकास आघाडीच्या सभांमध्ये आम्ही सहभागी आहोत. पण त्याचबरोबर संभाजीनगर, खेड, मालेगाव येथील सभांनंतर आता पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होईल. पक्षबांधणीसाठी आम्ही सभा आयोजित केल्या आहेत. जळगावच्या पाचोऱ्यातील प्रमुख नेते आर. ओ. तात्या पाटील हे आमचे आमदारही होते. मधल्या काळात त्यांचे निधन झाले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पुतण्याला आमदार केले. त्यांचा पुतण्या गद्दार झाला, पळून गेला. आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळय़ाचे अनावरण आणि त्यानिमित्ताने संध्याकाळी पाचोऱ्यात शिवसेनेची सभा असा कार्यक्रम ठरला आहे', असे संजय राऊत यांनी सांगितले.