(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाळीव प्राण्यांचे मालक आणि सोसायटीमधील रहिवाशांमध्ये समतोल राखण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन
महाराष्ट्रामध्ये 1,15,000 रजिस्टर सोसायटी आहेत. ज्यापैकी 65000 सोसायटी या एमएमआरडीए रिजनमध्ये आहेत. भारतात जवळपास 2 कोटी 2 लाख पाळीव प्राणी आहेत, ज्यापैकी सुमारे 54 लाख पाळीव प्राणी हे राज्यात आहेत.
मुंबई : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि अस्मिता लॉ कॉलेजचे फ्री लीगल अॅड यांच्या संयुक्त विद्यमानाने पाळीव प्राणी आणि कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या हक्कासंदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्राण्यांचे / गृहनिर्माण संस्थेमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावर या ऑनलाईन प्रबोधन आणि जनजागृती यावेळी करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये 650 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये लॉचे विद्यार्थी-शिक्षक जनावरांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि इतर मान्यवरांचा सामावेश होता. दीड तास चाललेल्या या ऑनलाईन प्रबोधन आणि जनजागृतीमध्ये पाळीव प्राण्यांन संदर्भातील कायदे, भटक्या जनावरांचें हक्क, पाळीव प्राण्यांच्या मालकांची जबाबदरी आणि हक्क, तसेच को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या हक्क आणि कर्तव्यांसंदर्भात माहिती देण्यात आली.
अस्मिता लॉ कॉलेज फ्री लीगल सेलचे हेड अॅडवोकेट केशव तिवारी यांनी या विषया संदर्भातील सखोल अभ्यास आणि संशोधन करत महाराष्ट्र आणि भारतामध्ये पाळीव प्राण्यांच्या संख्या किती आहेत, तसेच या सोबतच पाळीव प्राण्यांसाठी असणारे हक्क आणि कायदे तर रहिवाशांना होणाऱ्या गैरसोय याचा सखोल अभ्यास केला.
अस्मिता लॉ कॉलेज फ्री लेगल अॅडकडून एक सर्वेही करण्यात आला होता. यामध्ये पाळीव प्राण्यांचे मालक, हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे रहिवाशी, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील घेतल्या.
सर्वेमध्ये नेमकं काय आहे?
महाराष्ट्रामध्ये 1 लाख 15 हजार 000 रजिस्टर सोसायटी आहेत. ज्यापैकी 65,000 सोसायटी या एमएमआरडीए रिजनमध्ये आहेत. भारतात जवळपास 2 कोटी 2 लाख पाळीव प्राणी आहेत, ज्यापैकी सुमारे 54 लाख पाळीव प्राणी हे महाराष्ट्रात आहेत. या पाळीव प्राण्यांमध्ये 80 टक्के प्राणी कुत्रे किंवा मांजर या स्वरूपाचे आहेत. तर इतर 20 टक्केमध्ये कासव, पक्षी, मासे, ससा अशांचा समावेश आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटलेल्या सुविचाराने अॅड. केशव तिवारी यांनी आपला मुद्दा समजावला. महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की, जर एखाद्या देशाची खरी ओळख तुम्हाला करायची असेल तर ते त्यांच्या प्राण्यांना कशी वागणूक देतात ते पाहावं.
पाळीव प्राण्यांचे मालक आणि सोसायटीमधील रहिवाशांचे कित्येक वेळा त्यांच्या पाळीव प्राण्यांवरून भांडण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच पाळीव प्राण्यांसोबत सुद्धा अमानवीय घटना घडल्याची क्रमवारी मोठी आहे. या दोन्ही गोष्टी समाजामध्ये समाजासाठी योग्य नाहीत. ज्यामुळे या दोन्हींमध्ये समतोल राखण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ भारतचा नारा आपल्या सर्वांना माहिती आहे पण तो जर यशस्वी करायचा असेल तर पाळीव प्राण्यांच्या मालकांना जेव्हा ते त्यांच्या प्राण्यांना फेरफटका मारायला नेतात तेव्हा सोबत पु बॅग घेऊन जाण्यास सुरुवात करतील आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी असं समजतील.
सदर कार्यशाळेत फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिव श्रीमती छाया आजगावकर आणि उपाध्यक्ष श्रीयुत सुहास पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत करून या कार्यशाळेमुळे संस्थेमधील पाळीव प्राण्यांबद्दलचे वाद मिटतील अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य वक्ते प्रोफेसर केशव तीवारी, अस्मिता कॉलेज ऑफ लॉ यांनी मार्गदर्शन करताना विविध कायद्यानुसार असणाऱ्या प्राण्यांच्या संरक्षणा बद्दल तरतुदी सांगितल्या. तसेच पाळीव प्राणी प्रेमींनी गृहनिर्माण संस्थेत घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले. फेडरेशनचे तज्ञ संचालक ॲड. श्रीप्रसाद परब यांनी संविधनातील विविध तरतुदींचा तसेच पाळीव प्राण्यांबद्दल असलेले इतर कायदे आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांनी घ्यावयाची काळजी या बद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन केले.