कामाच्या ठिकाणी, कामाच्या वेळेत केस विंचरणं हे गैरवर्तनच : हायकोर्ट
कामाच्या ठिकाणी, कामाच्या वेळेत केस विंचरत बसणं हे गैरवर्तनच असल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे.तसंच वरीष्ठांनी ही चूक लक्षात आणून दिल्यावर त्यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की करणं हा गुन्हा असल्याचं हायकोर्टाने म्हटलं.कंपनीविरोधात दाद मागणाऱ्या गिरणी कामगाराला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई : कार्यालयात कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं हा सुद्धा गैरवर्तनाचा प्रकार आहे. त्यामुळे झालेली कारवाई योग्यच आहे, असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका गिरणी कामगाराला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उगारत त्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप करत कंपनीने या कामगाराविरोधात कारवाई केली होती. या प्रकरणात कनिष्ट न्यायालयाने कंपनीच्या बाजूने दिलेला निकाल योग्यच असल्याचंही हायकोर्टाने म्हटलं आहे.
काय घडली होती घटना? रंगाराव चौधरी या गिरणी कामगाराने डिसेंबर 2005 मध्ये कामगार न्यायालयाने त्याच्याविरोधात दिलेल्या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. कामगार न्यायालयाने कंपनी व्यवस्थापनाने रंगाराव यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई योग्यच असल्याचा निकाल दिला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, साल 1995 मध्ये एक दिवस नाईट ड्युटीवर असताना रंगाराव त्यांच्या जागेवर नव्हते. वरिष्ठांनी चौकशी करताच ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत असल्याचं त्या अधिकाऱ्याला आढळून आलं. तेव्हा रंगाराव यांनी तातडीने आपल्या जागेवर जाऊन कामास सुरुवात करावी, असं वरिष्ठांनी सांगताच रंगाराव संतापले आणि त्यांनी थेट वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत तिथे पडलेली लोखंडी सळई त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फेकून मारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
या घटनेनंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही केली होती. प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यात रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या मारहाणीसंदर्भात आपण शिक्षा भोगली असल्याने कंपनीने केलेली कारवाई रद्द करावी अशी मागणी करत कोर्टात दाद मागितली होती.
काय आहे हायकोर्टाचा निकाल? मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 'कंपनीची अंतर्गत चौकशी आणि कायदेशीर कारवाई एकाचवेळी होऊ शकते. दोन्ही तपास स्वतंत्र पद्धतीने करण्यात आले. कायद्यासमोर व्यक्ती दोषी ठरणं हे खाजगी कंपनीच्या अंतर्गत चौकशीमध्ये दोषी ठरवण्यापेक्षा फार मोठी गोष्ट आहे'. रंगाराव यांनी कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत आपलं काम करण्याऐवजी बाजूला जाऊन केस विंचरण हे कामाच्या कालावधी केलेलं गंभीर गैरवर्तनच आहे. इतकच नाही तर जेव्हा वरिष्ठांनी त्यांना समज देत काम करण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी काम सुरु करण्याऐवजी उलट वरिष्ठांनाच शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की सुरु केली. हे त्याहून मोठं गैरवर्तन आहे, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.