मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या सूचनांचा विचार करावा, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या सूचनांचा विचार करावा, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनवरुन वाद सुरू असताना दुसरीकडे विरोधी पक्ष अधिक आक्रमक होत चाललाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पनवेल, नवी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी त्याच्यासोबत प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक आदि नेते उपस्थित होते
फडणवीस कोरोनावर काय म्हणाले?
नवी मुंबईत कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना महाविकास आघाडीनं समन्वय साधत सुविधा वाढवल्या पाहिजे. नवी मुंबईत झपाट्यानं संख्या वाढत चाललीय त्यात वाशी मार्केट असल्यानं विविध भागातले लोक इकडे येतात. त्यामुळे कोरोना टेस्टिंगचं प्रमाण वाढलं पाहिजे नाहीतर कोरोनाचं संक्रमण वाढत जाईल, अशी भिती फडणवीस यांनी व्यक्त केली. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानं शासकीय रुग्णालयात जागा उरली नाहीय, त्यामुळे खासगी रुग्णालयात जावं लागतं सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयात जाणं हे न परवडणारं आहे, सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी
महाविकास आघाडीत बिघाडी?
नवी मुंबई दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी सरकारवर टीका करायची संधी सोडली नाही. सध्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या परिस्थितीनं महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोरोनावर मात करायची असेल तर समन्वय राखावा लागेल तसेच एकमेकांना विश्वासात घ्यावं लागेल अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री व नगरविकासमंत्री आहेत. त्यांनाच विश्वासात न घेता आयुक्तांच्या बदल्या केल्या गेल्याचं कानावर आलंय असं असेल तर चुकीचं आहे. तसेच वारंवार बदल्या करुन नेमकं सरकारला काय साधायचं आहे? कळत नसल्यचं फडणवीस यांनी बोलून दाखवलं.
मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या सूचनांचा विचार करावा मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवार आणि माझी अनेकदा भेट व्हायची, पवारसाहेब मला काही सूचना करायचे. त्याचं पालन मी करत असे, ठाकरेंचं मला माहित नाही. पण शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या सूचना ऐकूण त्या अंमलात आणाव्यात असा टोमणा फडणवीस यांनी मारला. गेल्या अनेक महिन्यांमध्ये ठाकरे पवार भेट होत आहे. कधी बाळासाहेब ठाकरे स्मारकात तर कधी मातोश्रीवर या भेटीनं नेहमीच उलटसुलट चर्चा होत राहतात. त्यामुळे अनेक बैठकानंतरीही महाविकास आघाडीत फारसं चांगलं नसल्याचं दिसत असल्यानं फडणवीसांनी निशाणा साधला.
कार्यकारिणीत सर्वांना न्याय
भाजपच्या नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीवरुन धुसपूस सुरू असल्याचं समोर आलंय. काही महत्त्वाच्या नेत्यांना डावलल्यानं पुन्हा एकदा फडणवीसांचा जोर दिसून आला. कार्यकारिणीत सर्वांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला आहे, सर्वच कार्यकर्ते हे समाधानी आहे, काही जणांची नावं केंद्रात पाठवली आहे, त्यापैकी एक नाव आपल्याला माहित असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं पण तावडे, खडसे पंकजा, मेहता यांना या कार्यकारिणीत फारसं स्थान नसल्यानं नाराज असल्याचं समजतंय.
Devendra Fadnavis | कोरोना टेस्टिंगचं प्रमाण दुप्पटीने वाढवण्याची गरज : देवेंद्र फडणवीस