(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Metro : कारशेडबाबतचा घोंगडं अजूनही भिजत; पर्यायी जागांचा विचार करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
मेट्रो 3 कारशेडसाठी प्रस्तावित कांजूरमार्गची जागा न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने आता पर्यायी जागांचा विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिली आहे.
मुंबई : एकीकडे मेट्रो प्रकल्प पूर्ण होत असताना मेट्रो 3 लाईनच्या कारशेडच्या जागेबाबतची कोंडी सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे. मेट्रो 3 कारशेडसाठी प्रस्तावित कांजूरमार्गची जागा न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने आता पुन्हा एकदा या कारशेडसाठी पर्यायी जागांचा विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प तयार होतोय पण कारशेडबाबतचा घोंगडं अजूनही भिजत आहे.
मेट्रो 3 कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण एकीकडे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतयेत मात्र दुसरीकडे मेट्रो कारशेड जमिनीबाबत नेमका निर्णय काय घ्यायचा या विचारात अजूनही सरकार आहे. आरे कारशेडमध्ये सुरवातीला मेट्रो 3 कारशेडचे काम सुरु झाले. मात्र, भाजप सेना युती सरकार नंतर महाविकास आघाडी सरकार येताच पर्यावरणाचा मुद्द्यावरून आरेमधून हे कारशेड कांजूरमार्गला हलविण्यात आले. मात्र, येथे सुद्धा या कारशेडला विग्न आले आणि या कांजूरमार्गची जमीन केंद्र सरकारची असल्याचं सांगत प्रकरण न्यायालयात अडकलं.
आता कांजूरमार्ग व्यतिरिक्त इतर पर्यायी जागा शोधण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या तेंव्हा आधी विचारात असलेल्या बिकेसी, कलिना आणि पहाडी गोरेगाव जागेचा विचार करावा लागणार आहे. त्यातील पहाडी गोरेगावचा पर्याय विचारत घेऊन तो व्यवहार्य आहे का? पहाडी गोरेगाव येथील जमिनीबाबत काही वाद आहे का, याची शहानिशा करुन त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती आहे.
पण या सगळ्या कारशेड जमिनीच्या वादात आणि रखडेलल्या कामात मेट्रो 3 प्रकल्पाच्या किंमतीत 10 हजार कोटींची वाढ झाली असून या मेट्रो 3 प्रकल्पाचा एकूण खर्च 23 हजार कोटीवरून 33 हजार कोटींवर गेला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आता त्यात इतर पर्ययी जागा शोधल्यास हा खर्च आणखी वाढणार असल्याच बोललोय जातंय. त्यामुळे मेट्रो 3 सुरु झाल्यास ट्रॉफीक समस्या दूर व्हावी यासाठी वाट पाहत असलेल्या मुंबईकराना आता आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे?
मेट्रो 3 प्रकल्पाचे काम पूर्ण होतं आलं आहे, गाड्यासुद्धा तयार आहेत. मात्र कारशेड जमीनीबाबतचा प्रश्न महाविकास आघाडीची डोकेदुखी बनलीय. आता तातडीने यावर निर्णय घेण्याची आणि एक जागा सर्व निकष ठरवून निश्चित करुन त्या जागेवर कारशेडचा काम सुरू करण्याची आणि रखडेलल्या का कामाला पूर्णत्वास नेऊन मेट्रो सुरु करण्याची गरज आहे. मात्र हे करताना 'पुन्हा पहिले पाढे पंचावन्न' होऊ नये म्हणजे झालं.
पहा व्हिडीओ : Mumbai Metro : Metro 3 चं कारशेड होणार तरी कुठे? मेट्रो कारशेडच्या जागेचा तिढा केव्हा सुटणार?
महत्वाच्या बातम्या :