Chris Gayle : T20 क्रिकेटमध्ये क्रिस गेलचा अनोखा विक्रम; 14000 धावा करणारा पहिला फलंदाज
Chris Gayle : टी20 मधील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून क्रिस गेलला ओळखलं जातं. अशातच आता त्यानं एक विक्रम आपल्या नावे केला आहे. क्रिस गेल टी20 क्रिकेटमध्ये 14000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
![Chris Gayle : T20 क्रिकेटमध्ये क्रिस गेलचा अनोखा विक्रम; 14000 धावा करणारा पहिला फलंदाज chris gayle become first cricketer of world to score 14k runs in t20 format Chris Gayle : T20 क्रिकेटमध्ये क्रिस गेलचा अनोखा विक्रम; 14000 धावा करणारा पहिला फलंदाज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2019/02/08141943/chris-gayle-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chris Gayle : क्रिस गेल आणि टी20 क्रिकेट हे समीकरण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट टी20 क्रिकेटर्सच्या यादीत क्रिस गेलचा समावेश करण्यात येतो. वयाची 40 पार केलेल्या क्रिस गेलचा टी20 क्रिकेटमधील जलवा अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात क्रिस गेलनं इतिहास रचला आहे. क्रिस गेल टी20 क्रिकेटमध्ये 14000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
काही दिवसातच क्रिस गेल आपल्या वयाची 42 वर्ष पूर्ण करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अद्यापही यंदाच्या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात क्रिस गेलचं स्थान पक्क आहे. एवढंच नाहीतर क्रिस गेलचा समावेश वेस्ट इंडिजच्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये करण्यात येतो. क्रिस गेलनं ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या टी20 सामन्यात 38 चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकार लगावत 67 धावांची खेळी केली. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी क्रिस गेलनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यासोबतच तो टी20 मध्ये 14000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तो जगातील एकमात्र फलंदाजांपैकी एक आहे. ज्यानं 1000 हून अधिक षटकार आणि चौकार लगावले आहेत. गेलनं 1028 षटकार आणि 1089 चौकार लगावले आहेत. टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल दुसऱ्या स्थानी आहे. सध्या या यादीत कायरन पोलार्ड गेलपेक्षा 3202 धावांनी पुढे आहे. क्रिस गेलने 430 सामने खेळले आहेत. क्रिस गेल जगातील एकमेव असा खेळाडू आहे, ज्यानं टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 शतक ठोकले आहेत.
टी20 वर्ल्डकपमध्ये खेळणार क्रिस गेल
क्रिस गेलचं यंदाच्या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळणं निश्चित आहे. वेस्ट इंडिजच्या संघाच्या वतीनं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे की, क्रिस गेलच्या संघात असण्यानच विरोधी संघावर दबाव येतो. याव्यतिरिक्त क्रिस गेलचं म्हणणं आहे की, त्याला वयाच्या 45 वर्षापर्यंत क्रिकेट खेळायचं आहे.
क्रिस गेल आता वेस्ट इंडिजच्या वतीनं केवळ टी20 क्रिकेट खेळत आहे. याव्यतिरिक्त क्रिस गेल इंडियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग यांसारख्या प्रसिद्ध क्रिकेट लीगचाही हिस्सा आहे. या लीगमध्येही क्रिस गेलं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)