Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Sunil Shelke: उमेदवारी नाकारण्याच्या भीतीनं थेट भाजपात प्रवेश; सुनील शेळके म्हणाले, मी घरी कार्यक्रम आहे जाऊन येतो अन्..., झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग

पुणे: पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या डावपेचांना वेग आला आहे. मावळ तालुक्यात भाजपने पहिला धक्का अजित पवारांना दिला आहे. आमदार सुनील शेळकेंचे खंदे समर्थक आणि उपाध्यक्ष प्रशांत भागवत थेट भाजपमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशांत भागवत यांनी पत्नी मेघा भागवतांसोबत कमळ हाती घेतलं आहे. जिल्हा परिषद इंदोरी-वराळे गटात यानिमित्ताने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी देण्याचा घाट घातला जाणार आणि मेघा भागवत यांना डावलले जाणार ही शंका गृहीत धरून भागवत दाम्पत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. प्रवेशाच्या काही वेळ आधी सुनील शेळकेंना याबाबाबत विचारलं तेव्हा प्रशांत आज ही आमच्या सोबत आहे, असा दावा केला होता. त्यामुळं शेळकेंना हा धक्का मानला जातोय.
सुनील शेळके नेमंक काय म्हणाले?
प्रशांत भागवत यांनी राजीनामा दिलेला आहे ते तुमचे निष्ठावंत होते याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले, माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, तुमच्याकडे राजीनामा आला असेल पण माझ्याकडे पोहोचलेला नाही, प्रशांत भागवत कालही आमच्याबरोबर होता. आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होता, संध्याकाळी त्याला सांगितलं होतं की आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत, परंतु त्यांनी ब्राह्मण वाडीत घर बांधलेलं आहे. त्या घराचा कार्यक्रम होता. म्हणून मी तिकडे जाऊन येतो असं त्यांनी मला सांगितलं, तो अद्याप इकडे आलेला नाही. मात्र, आम्हाला राजीनामा बद्दल काही माहिती नाही, असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
तर सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आणि भागवतांनी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की, माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती मात्र... प्रश्न पूर्ण होण्याआधीच सुनील शेळके म्हणाले, त्याची उमेदवारी कोणी कट केली? त्याची उमेदवारी दिली की कट केली किंवा कोणत्या आयताला दिली किंवा निर्यातला दिली ती आम्ही जाहीर केलेली आहे का? अजून आमचा निर्णय आम्ही सांगितला का?, ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळी सगळं स्पष्ट होईल उमेदवारी कोणाला दिली कोणाला नाही ते, आज आम्ही कोणाला बोलणं किंवा उमेदवार म्हणून त्याला थांबवलं आहे का? किंवा मी त्याला उमेदवारी नाकारली आहे का? कोर कमिटीतले प्रमुख मंडळी आहोत, उद्या जर युती म्हणून काही जागा सोडाव्या लागल्या, आम्हालाही ऐकावं लागेल, त्यालाही ऐकावं लागेल, भाजपच्या मंडळींना देखील काही गोष्टी ऐकावे लागतील, आमच्या इच्छुक उमेदवारांना देखील ऐकावं लागेल, असं काही नाही असं पुढे सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

























