राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
![राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री Chief Minister Uddhav Thackeray has paid tributes to senior leader Ganapatrao Deshmukh. राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/30/44bf9409ba5a6737254733677d17838c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, की ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
सकाळी 6 वाजता सोलापूर शहरातील रुग्णालयातून पार्थिव गणपतराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पेनूर, मोहोळ येथे जाईल. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता पेनूर, मोहोळ येथून त्यांचं सध्याचे राहते घर असलेल्या सांगोल्याला रवाना होतील. सकाळी 11 पर्यंत सांगोल्यातील घरात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सांगोल्यातील सूत मिल परिसरात अंत्यसंस्कार होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)