Shiv Jayanti 2022 : शिवकालीन इतिहासाचा वसा जपण्याचा छंद, घरातच निर्माण केलं अनोखं ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय!
महाराजांनी एखादा गड काबीज केल्यास आनंदोत्सवात नाणी उधळली जायची. ती नाणी काहींना मिळत, तर काही अद्यापही कडेकपाऱ्यात किंवा झाडांझुडपात अडकून पडलेली आहेत.
Shiv Jayanti 2022 : अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj). महाराजांनी मावळ्यांसोबत घडवलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्यासोबतच आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. शिवराज्यभिषेकाच्या दिवशी या चलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. देवनागरी लिपीत लिहिलेले नाणे समस्त महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक बनले. तेव्हाच स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे 'शिवराई' हे नाणं स्वराज्याला मिळालं. या नाण्यांची ओढ आणि आकर्षण तमाम शिवप्रेमींमध्ये असते. पण, ती नाणी जमवण्याची आवड जोपासलेले काही मोजकेच असतात. त्यापैकी एक म्हणजे राजा जाधव (Raja Jadhav). जाधव यांनी जीवनातील प्रवासात विभिन्न प्रकारची अनेक नाणी जमवली. त्यातूनच त्यांची नाण्यांपोटी गोडीही वाढत गेली आणि त्यांच्याकडे 'नाणींसंग्रह' तयार झाला. त्या नाण्यांतील विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेली शिवकालीन 'शिवराई' ही नाणी.
राजा जाधव यांना रिझर्व्ह बँकेत कामाला असताना फिरावे लागत असे. साल 1982-83ला गंगोत्रीला गेले असताना लहान, मोठ्या आकाराची विविध भाषेची नाणी विकायला ठेवलेली त्यांना दिसली. ती नाणी ही शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचं त्यांना समजलं. तिथेच देवनागरी शब्द असलेल्या नाण्यांवर त्यांचे लक्ष गेले, तेव्हा ती शिवकालीन नाणी असल्याचं त्यांना समजलं आणि ती सर्व नाणी त्यांनी विकत घेतली. तेव्हापासून जाधव यांचा नाणीसंग्रह करण्याचा प्रवास आजही सुरू आहे. आज त्यांच्याकडे विविध प्रकारची नाणी असली तरी 'शिवराई' नाणी ही त्यांच्यासाठी खास असल्याचं जाधव सांगतात. शिवकाळातला सोन्याचा 'होन' मिळणे दुर्लभ असले, तरी ताब्यांची शिवराई मात्र अजूनही गड-किल्यांवर किंवा जुन्या शिवकालीन वाड्यांमध्ये, मंदिरात आढळून येत असल्याचं जाधव सांगतात.
आनंदोत्सवात उधळली जायची नाणी!
महाराजांनी एखादा गड काबीज केल्यास आनंदोत्सवात नाणी उधळली जायची. ती नाणी काहींना मिळत, तर काही अद्यापही कडेकपाऱ्यात किंवा झाडांझुडपात अडकून पडलेली आहेत. पावसाळ्यात गडावरून येणारे पाणी ही नाणी पायथ्यांशी असलेल्या गावातील नदीत बरेचदा वाहत येतात. ती नाणी गोळा करण्याचं काम गावात राहणारे झाडकरी करत असतात. अशा झाडकऱ्यांकडून आपण अनेक शिवकालीन नाणी जमा केली आहेत, असे ते सांगतात.
शिवराई कशी ओळखावी?
जाधवांकडे 3 हजार शिवराई नाणी आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, अशी चित्र काढलेली आहेत. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारात असलेल्या शिवराईपैकी मोठ्या शिवराईचे वजन हे 8 ग्रॅम, तर लहान शिवराईचे वजन 4 ग्रॅम असतं. या विविध परिमाणांच्या शिवराईंचे अक्षर वळण साधारणतः सारखेच असून, त्या वरील लेख हा पुढील बाजूने तीन ओळींत 'श्री /राजा/ शिव' आणि मागील बाजूला 'छत्र/ पति' असा असल्याचे आढळून येते. तर 'श्री/राजा/शिव,छत्र/पति' या मजकुरा व्यतिरिक्त पुढील बाजूला 'श्री /राजा/शीव', 'श्री /राजा /सिव', 'श्री /राजा/ सीव' असलेल्या शिवराईदेखील सापडतात. अशी 152 विविध प्रकारची शिवराई होती, असं जाधव सांगतात.
इतिहासाचा अनोखा ठेवा
राजा जाधव यांचा हा नाणी संग्रहाचा छंद आजही सुरू आहे. सध्या त्यांच्या संग्रहात जवळपास पंधरा हजाराहून अधिक नाणी आहेत. या संग्रहात अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजान, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, राणी एलिझाबेथ, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विशिष्ट नाणी वापरली जात ती नाणी देखील या संग्रहात आहेत. याशिवाय जुन्या नोटा, दुर्मिळ पुस्तकं, द्वितीय महायुद्धातील वृत्तपत्रातील मथळे असे अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज त्यांच्या नालासोपारा स्थित घरातील छोटेखानी संग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहेत.
या संग्रहात युद्धात वापरलेल्या तीन धोप तलवारी, तसेच गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली एक ढालही सामील आहे. त्यासोबतच नर-मादी शंख, क्रिस्टल(स्फटिक) ऐतहासिक नक्षीकाम केलेली असंख्या भांडी, समया, लामण दिवे, इस्त्री, किल्ल्यांची टाळी अश्या असंख्य गोष्टी संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश येथील मोठ्या आकाराचे हंडे, कमंडलु, जुन्या काळातील सोने-चांदी मोजणारी परिमाणे, अडकित्तेही या संग्रहात सामील आहेत. राजा जाधव यांचा हा अनमोल संग्रह पाहून स्वतः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :
- Shiv Jayanti 2022: 'शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध'; पंतप्रधान मोदींकडून खास फोटो ट्वीट, राहुल गांधींकडूनही वंदन
- Shiv Jayanti : झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरीवर उत्साह, पाहा खास फोटो
- PHOTO : कुणी भव्य रांगोळी काढली तर कुणी तिळावर साकारले शिवराय; कलाकृतीतून महाराजांना मुजरा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha